नंदुरबार : धडगाव तालुक्यातील लेगापाणी ग्रामसभेने सामुदायिक वनहक्क व्यवस्थापनाच्या क्षेत्रात आदर्श ठरेल, असा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. आदिवासी व ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जाणारा महिला नेतृत्वाखालील पहिला बांबू उत्पादक कंपनीचा उपक्रम राबविण्यात आला आहे. या अंतर्गत साडेसात मे.टन बांबूची पहिली निर्यात करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेली तोरणादेवी जंगल प्रोड्यूसर कंपनी ही १२ ग्रामसभांच्या सहभागातून उभी राहिलेली महिला नेतृत्वाखालील सामुदायिक संस्था आहे. वनहक्कातून मिळालेल्या संसाधनांना थेट उद्योग आणि बाजारपेठेशी जोडण्याचे कार्य करत आहे.
लेगापाणी ग्रामसभा अंतर्गत कार्यरत सामूहिक वनव्यवस्थापन समिती यांच्या समन्वयातून महिलांनी संपूर्ण जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली. हैद्राबाद येथील इंडियन स्कूल ऑफ बिझनेस यांचे तांत्रिक व व्यवस्थापनात्मक मार्गदर्शन लाभले असून जिल्हा प्रशासनाकडून बांबू प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी सहकार्य दिले जात आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या हस्ते झाले होते. कार्यक्रमास आमदार आमशा पाडवी तसेच आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अनय नावंदर उपस्थित होते. हा उपक्रम पुढील महत्त्वाचे परिणाम घडवून आणत आहे वनहक्क ते बाजारहक्क यांची प्रभावी जोड, महिलांचे नेतृत्व व आर्थिक सक्षमीकरण, स्थानिक रोजगारनिर्मिती व स्थलांतरात घट होणार आहे.
आदिवासी विकास विभागामार्फत परवाना केला जारी...महाराष्ट्रात प्रथमच ग्रामसभेमार्फत स्वतः व्यवस्थापित प्रक्रियेद्वारे आदिवासी विकास विभागामार्फत जारी परवाना वापरून बांबू विक्री व्यवहार पूर्ण करण्यात आला, ही अत्यंत उल्लेखनीय बाब ठरली आहे.
महाराष्ट्राच्या धर्तीवर सेवा समितीमार्फत घेण्यात आलेल्या सामूहिक निर्णयामुळे वन संसाधनांचे व्यवस्थापन, विक्री व्यवहार व आर्थिक प्रक्रिया पूर्णपणे समुदायाच्या माध्यमातून पार पडल्या. बांबू खरेदीदाराशी थेट व्यवहार करून संबंधित रक्कम उत्पादक कंपनीच्या खात्यात जमा करण्यात आली.
रोजगार निर्मिती व आर्थिक स्वावलंबन...नंदुरबार जिल्ह्यातील ७० टक्के आदिवासी लोकसंख्या पारंपरिकरित्या जंगलावर अवलंबून असून रोजगारासाठी हंगामी स्थलांतर ही मोठी समस्या होती. मात्र या उपक्रमामुळे जंगलावर आधारित उपजीविकेला संघटित उद्योगाचे स्वरूप प्राप्त होत असून स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती व आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग निर्माण झाला आहे.
या ऐतिहासिक प्रक्रियेतील पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणून लेगापाणी क्षेत्रातून बांबू विक्रीचा पहिला ट्रक यशस्वीरित्या रवाना करण्यात आला. यात ८६६ बांबू पोल होते. त्यांचे वजन साधारणतः साडेसात मे. टन इतके राहिले.