जळगाव : रासायनिक खतांच्या जास्त वापरामुळे जमिनीचा पोत खराब होत असतांना ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे आंबवलेल्या सेंद्रिय खताचा प्रयोग सुरु केला आहे. सुरुवातीला हा प्रयोग केवळ जळगाव तालुक्यातील फुपनगरी गावात सुरु केला आहे.
तसेच टप्प्याटप्प्याने हा प्रयोग वाढवून, शेतकऱ्यांना सेंद्रीय वळविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. हेमंत बाहेती यांनी दिली.
काय आहे आंबवलेले सेंद्रिय खत..?
आंबवलेले सेंद्रिय खत हे पिकांच्या अवशेषांसारख्या सेंद्रिय कचऱ्याच्या अनारोबिक किण्वन प्रक्रियेद्वारे तयार केलेले सेंद्रिय खत आहे. ही प्रक्रिया सहसा बायोगॅस संयंत्रांमध्ये केली जाते. या खतामुळे मातीची सुपीकता सुधारते, वनस्पर्तीची निकोप वाढ होते आणि रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होते. हे खत घन आणि द्रवअशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे.
केव्हीकेच्या माध्यमातून देशभरात सुरू आहेत प्रयोग
जमिनीच्या आरोग्यविषयक समस्यांवर मात करण्यासाठी खतांचा संतुलित वापर करण्यासोबतच जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करणे महत्त्वाचे आहे. याच धर्तीवर, भारत सरकार देशभरात कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून सेंद्रिय खतांच्या वापराला प्रोत्साहन देत आहे.
याचाच एक भाग म्हणून, कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद फार्म (जळगाव) यांच्याकडून जळगाव तालुक्यातील फुपनगरी येथे शेतात आंबवलेल्या सेंद्रिय खताचे प्रात्यक्षिक राबवण्यात येत आहे.
