Vihir Adhigrakhan Mobadala : देऊळगाव राजा तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईने ग्रामीण भाग हैराण झाला आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी शासनाने विहिरींचे अधिग्रहण करून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला.
शेतकऱ्यांनी शेतीसाठी राखून ठेवलेले पाणी बाजूला ठेवून, शासनाच्या विनंतीवर अल्प मोबदल्यात आपल्या विहिरी अधिग्रहित करण्यास संमती दिली.
मात्र, या सामाजिक जबाबदारीची किंमत शेतकऱ्यांना अजूनही मोजावी लागत असून, शासनाकडून विहीर अधिग्रहण व टँकरपुरवठ्याचा मिळून सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचा मोबदला थकलेला आहे.
स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०२३ ते २०२५ या कालावधीत विहीर अधिग्रहणासाठी १ कोटी ६ लाख ८६ हजार ८०० रुपये, तर २०२४-२५ मध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी १ कोटी ८६ लाख रुपये अद्याप अदा करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शासनाच्या धोरणात्मक निर्णयांचा आर्थिक भार थेट शेतकऱ्यांवर पडत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
पाणी दिले, पीक वाचवले नाही
तालुक्यात २०२२ पासून पर्जन्यमानात सतत चढ-उतार होत असून, कधी अतिवृष्टी तर कधी अल्पवृष्टीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला. अनेक गावांमध्ये नळयोजना कोरड्या पडल्याने विहिरी अधिग्रहित करून टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.
या काळात शेतकऱ्यांनी स्वतःच्या पिकांसाठीचे पाणी थांबवून गावकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिले. शासन आदेशानुसार दररोज ६०० रुपये मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात हा मोबदला आजही कागदावरच अडकलेला आहे.
८२ विहीर मालक मोबदल्याच्या प्रतीक्षेत
देऊळगाव राजा तालुक्यातील जवळखेड, वाणेगाव, शिन गाव जहांगीर, अंभोरा, बोराखेडी, बावरा, डोईफोडे वाडी, गिरोली बुद्रुक, उंबरखेड, गोळेगाव, अंढेरा, भिवगाव बुद्रुक, जुमडा, किन्ही पवार, चिंचखेड, टाकरखेड वायाळ, दिग्रस बुद्रुक, गारखेड, जांभोरा, सुलतानपूर, सावंगी टेकाळे, पळसखेड झाल्टा, मेंडगाव, खाल्याळगव्हाण, नारायण खेड, तुळजापूर, बायगाव बुद्रुक, गारगुंडी, सावखेड नागरे, सावखेड भोई आदी गावांतील एकूण ८२ विहीर मालकांच्या विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या.
काही विहिरी टँकरसाठी, तर काही थेट नळयोजनेला जोडून गावांना पाणीपुरवठा करण्यात आला.
वर्षनिहाय थकबाकी किती?
२०२२-२३ : ७ लाख ३६ हजार ८०० रुपये
२०२३-२४ : ६९ लाख ९३ हजार ६०० रुपये
२०२४-२५ : २९ लाख ६६ हजार ४०० रुपये
एकूण विहीर अधिग्रहण थकबाकी : १ कोटी ६ लाख ८६ हजार ८०० रुपये
कार्यालयांचे उंबरठे झिजले
विहीर मालक शेतकरी पंचायत समिती व तहसील कार्यालयात मोबदल्यासाठी सातत्याने चकरा मारत आहेत. मात्र, 'निधी अद्याप प्राप्त झालेला नाही; निधी आला की मोबदला दिला जाईल,' एवढेच उत्तर प्रशासनाकडून मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
मी शासन आदेशानुसार ८१ दिवस विहीर अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला; पण माझ्या विहिरीतील पाण्याचा मोबदला अजून मिळालेला नाही.- गोविंदराव वायाळ, विहीर मालक, चिंचखेड
विहीर मालकांच्या थकबाकीचा मुद्दा मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला असून त्याचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या पिकाला पाणी न देता पाणीटंचाई निवारणासाठी सहकार्य केले आहे. त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही; लवकरच निधी प्राप्त होऊन नियमानुसार मोबदला अदा केला जाईल.- मनोज कायंदे, आमदार
शासनाकडून निधी मिळताच संबंधित विहीर मालकांना तात्काळ मोबदला दिला जाईल. - मुकेश माहोर, गटविकास अधिकारी
संवेदनशीलतेचा अभाव?
भीषण पाणीटंचाईत शेतकऱ्यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी आणि शासनाकडून होणारा विलंब यातील विसंगती ठळकपणे समोर आली आहे. 'आम्ही गावासाठी पाणी दिले, मग चूक केली का?' असा प्रश्न आता विहीर मालक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून मोबदला अदा करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
Web Summary : Farmers in Deulgaon Raja, Maharashtra, await compensation for wells acquired by the government for water supply during droughts. Despite promises and farmers providing water, approximately ₹2.75 crore is outstanding. Farmers are frustrated by the delayed payments.
Web Summary : महाराष्ट्र के देउलगांव राजा में किसानों को सूखे के दौरान पानी की आपूर्ति के लिए सरकार द्वारा अधिग्रहित कुओं के मुआवजे का इंतजार है। वादों और किसानों द्वारा पानी उपलब्ध कराने के बावजूद, लगभग ₹2.75 करोड़ बकाया है। किसान भुगतान में देरी से निराश हैं।