Join us

नाशिक जिल्ह्यातील 'हा' साखर कारखाना विक्रीला काढला, विक्रीसाठीची निविदाप्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 13:20 IST

Vasaka Sakhar Karkhana : नाशिक जिल्ह्यातील पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या 'या' साखर कारखान्याची विक्रीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

नाशिक : पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्याची (Vasantdada Cooperative Sugar Factory) विक्रीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह अध्यक्ष असलेल्या एनसीडीसी नवी दिल्ली यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या डी. आर. टी. कोर्टाच्या आदेशानुसार दि. २० ऑगस्ट रोजी अंतिम ऑनलाइन प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. 

तशा आशयाची नोटीस वसाका कारखाना गेटवर लावण्यात आली असल्याने सभासद व कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे. 'एनसीडीसी'चे वसाका कारखान्याकडे थकीत कर्ज नाही. मुख्यतः एम. एस. सी. म्हणजे शिखर बैंक १२४ कोटी, कर्मचाऱ्यांचे घेणे ४१ कोटी, एचडीएफसी बँक ३४ कोटी व अन्य थकीत देणी आहेत. 

राष्ट्रीयीकृत बँकांचे घेणे असताना एनसीडीसीच्या थकीत कर्जापोटी कारखाना विक्रीची प्रक्रिया सुरू केली जात आहे. वसाका चालू व्हावा म्हणून आकांडतांडव करणाऱ्यांचा या विक्री प्रक्रियेला वसाका बचाव समिती, लोकप्रतिनिधी, कामगार युनियन, वा इतर संबंधित संस्थांचा आक्षेप नाही का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. कारखान्याचा लिलाव राजकीय दडपणाखाली होत आहे का? हा प्रश्न उपस्थित केला आहे.

हे सर्व लिलाव नाट्य घडत असताना दुसरीकडे कुठल्याही परिस्थितीत कारखाना सुरू झाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून वरिष्ठ पातळीवर, तसेच आजी-माजी कामगार व सभासदांकडून प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी मागील आठवड्यात कामगारांनी आमरण उपोषणाचे हत्यारही उपसले आहे. वेळ पडल्यास शिखर बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयांवर बिऱ्हाड मोर्चा काढण्याचा इशारा या उपोषणाच्या निमित्ताने देण्यात आला आहे. 

काहींनी कारखाना कार्यक्षेत्रातील अभ्यासू व जाणकार सभासद, लोकप्रतिनिधी व शासनाचे प्रतिनिधी यांचे लवाद मंडळ नेमून व वसाकाचे थकीत कर्जाचे पुनर्गठन करून मालमत्ता व्हॅल्यूएशन करून त्यावर शासकीय मदत मिळवून वसाका सुरू करावा, अशी मागणी केली आहे.

वसाका विक्रीची परस्पर सुरू झालेली प्रक्रिया सभासदांचा विश्वासघात करणारी आहे. वसाकाची विक्री करून तो एका व्यक्तीच्या घशात घालण्याचा हा कुटिल डाव आहे. वसाका सहकार तत्त्वावर चालू करून हा डाव हाणून पाडण्यात येईल.- पंडितराव निकम, सभासद, वसाका

वसाका विक्रीची प्रक्रिया परस्पर सुरू करण्यात आली असून, विक्री नोटीस काढण्यात आली आहे. २० ऑगस्ट रोजी ऑनलाइन पद्धतीने ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. वसाका वाचवण्यासाठी संबंधित घटकाची तातडीने एकत्रित बैठक घेऊन विचार विनिमय होणे आवश्यक आहे.- सुनील देवरे, वसाका बचाव समिती

'वसाका'ची विक्री न होता तो सहकार तत्त्वावर चालू होणे गरजेचे आहे. परस्पर विक्री प्रक्रिया राबविणे म्हणजे विश्वासघाताचा प्रकार आहे.- कुबेर जाधव, माजी कार्याध्यक्ष, वसाका मजदूर युनियन

टॅग्स :साखर कारखानेऊसनाशिकनिफाड