Ustod Kamgar Children : राज्यात सध्या ऊस गळीत हंगाम जोमात सुरू असून साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणीची लगबग वाढली आहे.(Ustod Kamgar Children)
पोटाची खळगी भरण्यासाठी छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील हजारो ऊसतोड कामगार ऊस पट्ट्याकडे स्थलांतरित झाले आहेत. (Ustod Kamgar Children)
मात्र, संसाराचा गाडा हाकण्यासाठी हातात घेतलेला कोयता त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर घाव घालत असल्याचे वास्तव पुन्हा समोर आले आहे.(Ustod Kamgar Children)
पाच ते सहा महिने शाळेबाहेर
ऊसतोड हंगाम साधारण पाच ते सहा महिने चालतो. या काळात आई-वडील कामासाठी स्थलांतरित होताना मुलांची देखभाल करण्यासाठी गावी कोणी नसल्याने त्यांना चिमुकल्यांना सोबत न्यावे लागते.
परिणामी मुलांचे चालू शैक्षणिक वर्ष अर्ध्यावरच थांबते. अनेक मुले शाळेपासून पूर्णपणे दुरावतात.
कारखाना परिसरात ठिकठिकाणी उघड्यावर, पालात किंवा उसाच्या फडात ही मुले खेळताना दिसतात.
मोठी मुले पालकांना कामात मदत करू लागतात, तर लहान मुले धाकट्या भावंडांची जबाबदारी सांभाळतात. शिक्षणाची पाटी हातात घेण्याच्या वयात त्यांच्या नशिबी मात्र फडातील कष्टाचा रस्ता येतो.
'साखरशाळा' फक्त नावापुरत्या?
ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी 'साखरशाळा' हा उपक्रम राबवला जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी त्याची प्रभावी अंमलबजावणी दिसून येत नाही. फडात ना पिण्याच्या पाण्याची नीट सोय, ना निवाऱ्याची व्यवस्था, ना नियमित शिक्षणाची हमी अशा परिस्थितीत मुलांचे आरोग्य आणि शिक्षण दोन्ही धोक्यात येते.
आम्ही ज्या ठिकाणी ऊसतोडीला जातो, तेथे राहण्याची व्यवस्था आम्हालाच करावी लागते. सुविधा मिळत नसल्याने मुलांचे शिक्षण पूर्ण होत नाही. आम्ही शिकलो नाही, म्हणून ऊस तोडतो; पण पोरांनी शिकावे असे वाटते. त्यांना कोणाकडे ठेवायचे? हा सवाल उपस्थित होतो. - वाल्मीक गांगुर्डे, ऊसतोड कामगार, तांदुळवाडी (ता. कन्नड)
गोड साखरेमागची कडू कहाणी
ज्या उसापासून साखर गोड बनते, त्याच उसाची कापणी करणाऱ्या कामगारांच्या आयुष्याची कहाणी मात्र कडू आहे.
एकदा शाळा सुटली की, या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे कठीण जाते. अनेकांची शिक्षणातील गळती कायमची ठरते.
तज्ज्ञांच्या मते, केवळ हंगामी शाळा सुरू करून प्रश्न सुटणार नाही. या मुलांच्या निवासाची आणि कायमस्वरूपी शिक्षणाची सोय त्यांच्या मूळ गावी करणे गरजेचे आहे.
स्थलांतरित कुटुंबांसाठी निवासी शाळा, पोर्टेबल शिक्षण केंद्रे आणि आरोग्य सुविधा उभारणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
संपूर्ण पिढी धोक्यात
योग्य उपाययोजना न झाल्यास उसावर चालणारा कोयता केवळ ऊसच नव्हे, तर एका संपूर्ण पिढीचे शैक्षणिक भविष्य कापून टाकेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
गोड साखरेमागील ही कडू वस्तुस्थिती बदलण्यासाठी शासन आणि समाजाने एकत्रित प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित होत आहे.
छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि अहिल्यानगर भागांतून स्थलांतरित झालेल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण ५ ते ६ महिने थांबत असून, गोड साखरेमागची ही कडू वस्तुस्थिती पुन्हा समोर आली आहे.
Web Summary : Sugarcane harvesting forces families to migrate, disrupting children's education. 'Sugar schools' lack resources, endangering their health and future. Children often work instead of attending school, highlighting the bitter reality behind sweet sugar. Permanent solutions are needed to protect this vulnerable generation.
Web Summary : गन्ना कटाई के कारण परिवारों को पलायन करना पड़ता है, जिससे बच्चों की शिक्षा बाधित होती है। 'चीनी स्कूलों' में संसाधनों की कमी है, जिससे उनके स्वास्थ्य और भविष्य खतरे में हैं। बच्चे अक्सर स्कूल जाने के बजाय काम करते हैं, जो मीठी चीनी के पीछे की कड़वी सच्चाई को उजागर करता है। इस कमजोर पीढ़ी की रक्षा के लिए स्थायी समाधान की आवश्यकता है।