Unseasonal Rain : दिवाळीच्या सणात आनंदाचे दिवस असताना, परतीच्या पावसाने मात्र बळीराजाच्या जीवनात काळोख आणला आहे. (Unseasonal Rain)
सलग पडणाऱ्या पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मका, कापूस आणि सोयाबीन या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. (Unseasonal Rain)
शेतात पाणी साचल्याने मक्याच्या कणसांना जागेवरच कोंब फुटले, तर कापसाच्या वाती होऊन गुणवत्ता पूर्णपणे बिघडली आहे.
सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीचे अनुदान अजूनही मिळालेले नाही. आता परतीच्या पावसाने पुन्हा शेतकऱ्यांवर संकट ओढवले असून, कर्ज आणि नुकसानीच्या दुहेरी चक्रात बळीराजा अडकला आहे.
सिल्लोड, फुलंब्री, कन्नड आणि सोयगावमध्ये सर्वाधिक तडाखा
या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक राहिला. शेतकऱ्यांच्या मते, सततच्या पावसामुळे मका, कापूस, सोयाबीन, तूर आणि अद्रकासह भाजीपाला पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. जनावरांचा चारा भिजून सडला, आणि अनेक ठिकाणी शेतातील पाणी अजूनही ओसरलेले नाही.
शासनाने नुकसानीचे त्वरित पंचनामे करून आर्थिक मदतीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.
भवन परिसरात दीड तास मुसळधार पाऊस
मंगळवारी पहाटे आणि दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भवन परिसरातील शेतकरी त्रस्त झाले. शेतात भिजलेले कापूस आणि पाण्यात पडलेले मका कणीस पूर्णतः खराब झाले आहे.
भराडी परिसरात शेतांचे मोठे नुकसान
भराडी, कासोद, धामणी, तळणी, वहाळा, पिलेला, मोहगाव आणि सिसारखेडा परिसरात मक्याचा शेत पाण्यात गेला, आणि कापसाच्या वाती झाल्या.
तळणी येथील नाल्यांना आलेल्या पूरामुळे घाटनांद्रा-भतडी मार्ग बंद पडला, तर अनेक गावांचा संपर्क तुटला.
केळीच्या बागाही जलमय – कोट्यवधींचे नुकसान
सोयगाव तालुक्यातील घोसला परिसरात मुसळधार पावसाने केळी, कापूस आणि मक्याची पिके वाहून गेली. सुमारे ३०० एकर शेत जमीन जलमय झाली असून, माती खरडून गेल्याने पुढील हंगामही धोक्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या मते, प्रशासनाने केवळ नावापुरते पंचनामे केले असून, प्रत्यक्ष मदत अद्याप पोहोचलेली नाही. यामुळे शेतकरी संतप्त असून, तातडीने मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
केळगाव परिसरात २ तास मुसळधार पाऊस
केळगाव, आधारवाडी, आमठाणा, तळणी परिसरात दोन तास सतत पाऊस झाला. त्यामुळे कापसाच्या वाती आणि मक्याच्या कणसांना अंकुर फुटले आहेत.
केळणा नदीला पूर – पाच गावांचा संपर्क तुटला
दुपारी चारच्या सुमारास केळणा नदीला पूर आल्याने केळगाव-आमठाणा रस्ता बंद झाला. परिणामी परिसरातील ५ गावांचा संपर्क तुटला, अनेक ग्रामस्थ पूरपाण्यात अडकले आहेत.
घाटनांद्रा परिसरात बळीराजाच्या कष्टावर पाणी
घाटनांद्रा आणि आसपासच्या गावात सलग पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे. आठशे रुपये मजुरी देऊन सोंगणी केलेला मका आता पाण्यात बुडाला, आणि कणसांना कोंब फुटले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.
शेतकऱ्यांची मागणी
सरकारने तातडीने पंचनामे करून भरीव आर्थिक मदत द्यावी; अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा भारतीय किसान संघाचे तालुकाध्यक्ष समाधान पाटील आणि शेतकरी नेते ईश्वर सपकाळवाणी यांनी दिला आहे.
दिवाळीच्या सणात अपेक्षित प्रकाशाऐवजी, पावसाच्या थैमानाने अंधार पसरवला आहे. बळीराजाच्या मेहनतीची पिके पाण्यात गेली, कर्जाचा डोंगर वाढला, आणि अनुदानाची वाट पाहत तो पुन्हा एकदा संकटाच्या विळख्यात सापडला आहे.
Web Summary : Unseasonal rains in Chhatrapati Sambhajinagar district have destroyed crops like maize, cotton, and soybean. Farmers face a double whammy of crop loss and delayed government aid, struggling with debt as crops rot in waterlogged fields. Financial assistance is urgently needed.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर जिले में बेमौसम बारिश ने मक्का, कपास और सोयाबीन जैसी फसलों को नष्ट कर दिया है। किसान फसल नुकसान और विलंबित सरकारी सहायता के दोहरे संकट का सामना कर रहे हैं, क्योंकि जलभराव वाले खेतों में फसलें सड़ रही हैं। तत्काल वित्तीय सहायता की आवश्यकता है।