Tur Solebhaji : हिवाळा हा अत्यंत आरोग्यदायी ऋतू असून, या मोसमात विविध पालेभाज्यांची रेलचेल असते. अशातच, शेतशिवारांमध्ये बहरलेल्या तुरीच्या शेंगापासून बनवली जाणारी सोलेभाजी हा सध्या प्रत्येक घराघरातील गृहिणींचा खास मेन्यू ठरत आहे.
गावखेड्यात शेतामधून तर शहरात बाजार किंवा बाजारपेठेतून तुरीच्या शेंगा खरेदी करून घरी बनवलेल्या सोलेभाजीला मोठी पसंती मिळत आहे. ग्रामीण भागात सध्या घरोघरी तुरीच्या सोलेभाजीचा महोत्सवच सुरू झाल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील शेतशिवारातील धुऱ्यावरील तुरीचे पीक सर्वत्र बहरलेले असून, शेंगांनी लदबदलेले आहे. हलक्या प्रतीच्या तुरी दाण्याने भरलेल्या आहेत.
तुरीच्या शेंगांपासून विविध प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात. तुरीच्या शेंगांच्या दाण्याच्या सोलेभाजीची चवच न्यारी आहे. या मोसमी भाजीची चव भल्याभल्यांना भुरळ घालते. ही झणझणीत व चवदार भाजी भाकरीसोबत खाल्ल्यास वेगळीच तृप्ती मिळते, असे खवय्ये सांगतात. तुरीच्या डाळीप्रमाणे तुरीच्या शेंगादेखील भारतीय आहारात तितक्याच लोकप्रिय आहेत. शिवाय, तुरीच्या दाण्यापासून अनेक प्रकारचे तिखट, गोड, चटपटीत असे चविष्ट पदार्थ बनवले जातात.
तूर एक, मात्र भाज्या अनेक
तुरीच्या शेंगांचे दाणे काढून त्यापासून सोलेभाजी व उसळ, सोलेवांगे, सोलेकोबी, आलू मिसळून मिस्सळ भाजी, सोलेभात, मोकळे सोले, सोले कचोरी, सोले कढी अशाप्रकारे एक ना अनेक प्रकारे भाजी केली जाते. भाजीव्यतिरिक्त दाणे शिल्लक राहिल्यास त्यांच्या वड्या बनवून वाळवतात. पाण्यात मीठ टाकून उकळलेल्या शेंगाही चविष्ट लागत असून, मोठ्या आवडीने खाल्ल्या जातात.
तुरीत जीवनसत्व व खनिजांचा स्रोत
तुरीच्या दाण्यांबरोबर तुरीच्या पानांचा, सालींचा, मुळांचा वापर औषधी म्हणून तर जनावरांसाठी खाद्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तू बनवण्यासाठी केला जातो. तुरीचे दाणे मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम व पोटॅशियमचा उत्तम स्रोत आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे. यातील फोलेट घटकामुळे अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी व हृदयाचे आरोग्य नियमित राहण्यासाठीही तूर मोठी फायदेशीर आहे.
