- कपिल केकत
दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. अंधार दूर करून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा संदेश देणारा हा सण. या सणाचा उत्साह मावळण्याआधीच, सर्वांना वेध लागतात ते तुळशी विवाहाचे. दैनंदिन जीवनातील लगबग, धावपळ, ताणतणाव यामध्ये सण, उत्सव मानवी मनाला उभारी देतात. म्हणूनच, अन्य सणांप्रमाणे तुळशी विवाहसुद्धा उत्साहात व दणक्यात साजरा करण्यात येतो.
दिवाळी सणाची सांगताच मुळी कार्तिकी एकादशीच्या तुळशी विवाहाने होते. तुळशीचे लग्न झालं की, सर्व मंगल कार्याना प्रारंभ होतो. शिवाय तुळशीचे लग्न केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवउठणी किंवा प्रबोधन एकादशी म्हटली जाते.
असे म्हणतात की, या दिवशी भगवान श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोधन उत्सव असे म्हणतात. हिंदू धर्मशास्त्रानुसार भगवान विष्णू हे सर्व शुभ व मंगल कार्याचे साक्षीदार आणि अधिष्ठाता आहेत. जोपर्यंत ते निद्रेत असतात (चातुर्मास) तोपर्यंत लग्न किंवा इतर कोणतेही मोठे शुभ कार्य करणे योग्य मानले जात नाही.
विष्णूंच्या जागृतीनंतरच लग्न, मुंज, गृहप्रवेश यांसारख्या कार्याना सुरुवात करणे शुभमानले जाते. तुळशी विवाह हा लग्नसराई सुरू करण्यासाठी शुभमुहूर्ताचा संकेत असतो. हा विष्णू (देव) आणि तुळस (लक्ष्मी स्वरूप) यांचा विवाह असतो, ज्यामुळे मानवी विवाहाचा मार्ग मोकळा होत असल्याचे सांगण्यात येते.
तुळशी विवाह सोहळा
आता तुळशीचे लग्न साजरे होणार आहे. प्रत्येक जण आवडीप्रमाणे व हौस म्हणून तुळस सजविण्याचा प्रयत्न करतो. काहीजण तुळशीच्या रोपट्याला साडीही नेसवतात. तुळशीला गौरीप्रमाणे सजवण्यात येते. गोरज मुहूर्तावर वराचे पूजन केले जाते. तुळशीचा विवाह केल्याने भगवान विष्णू व लक्ष्मी प्रसन्न होतात, असे मानले जाते.
तुळशी विवाह कथा
प्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चोहीकडे उपद्रव करत होता. त्याच्यात साहस असल्यामागे कारण होते, ते म्हणजे पत्नी वृंदा हिचा पतीव्रता धर्म होय, पत्नीच्या प्रभावामुळे तो सर्वव्यापी होता. परंतु, जालंधराच्या या उपद्रवामुळे त्रस्त देवगण प्रभू विष्णूकडे आले आणि संरक्षणासाठी याचना करू लागले. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वृंदा हिचा पतीव्रता धर्म भंग करण्याचा निश्चय केला.
इकडे वृंदाचे सतीत्व नष्ट झाल्यामुळे देवतांशी युद्ध करत असताना, जालंधरचा मृत्यू झाला. ही गोष्ट वृंदाच्या लक्षात आल्याक्षणी तिने क्रोधीत होऊन प्रभू विष्णूंना शाप दिला की, ज्या प्रकारे छळ करून तुम्ही मला पती वियोग दिला आहे, त्याप्रमाणे तुमच्याही पत्नीचा छळपूर्वक हरण होऊन स्त्री वियोग सहन करण्यासाठी तुम्हाला मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल असे म्हणत वृंदा पतीसोबत सती केली. ज्या जागी ती सती गेली त्या जागी तुळशीचे झाडं उत्पन्न झाले.
वृंदाने रागात विष्णूंना शाप दिला की माझे सतीत्व भंग केल्यामुळे तुम्ही दगड व्हाल. त्या दगडाला शालीग्राम म्हणतात. तेव्हा विष्णू म्हणाले की, हे वृंदा तुझ्या सतीत्वाचे फळ म्हणून तू तुळस बनून माझ्यासोबत राहशील. माझ्यासोबत तुझा विवाह लावणाऱ्यांना पुण्य लाभेल. तेव्हापासून तुळसविना शालिग्राम किंवा विष्णूची पूजा अपुरी मानली जाते. शालिग्राम व तुळशीचा विवाह प्रभू विष्णू व महालक्ष्मीच्या विवाहाचा प्रतिकात्मक विवाह आहे.
