Join us
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडू, पश्चिम बंगालचे केळी वाण जळगावच्या वातावरणात तग धरू शकतील का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 14:45 IST

Banana Varieties : राज्यांतील जवळपास ८० प्रकारच्या केळीच्या वाणांचा लागवडीतून अभ्यास करण्यात येत आहे.

जळगाव : जिल्ह्याची ओळख असलेल्या केळी पिकाला आता आधुनिक संशोधनाची जोड मिळत आहे. शहरातील चंदु अण्णा नगर परिसरातील केळी संशोधन केंद्रात देशभरातील विविध राज्यांतील जवळपास ८० प्रकारच्या केळीच्या वाणांचा लागवडीतून अभ्यास करण्यात येत आहे.

केळी संशोधन केंद्राच्या २५ एकर परिसरात संपूर्ण भारतातील केळीचे दर्शन घडत आहे. यामध्ये जळगावच्या स्थानिक वाणांसह आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, तेलंगाणा, पश्चिम बंगाल, झारखंड, गुजरात आणि महाराष्ट्रातील सोलापूर व वसई भागातील केळीच्या जातींची लागवड करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात जिल्ह्यात वादळे आणि तापमानातील अनिश्चिततेमुळे केळीचे मोठे नुकसान होत आहे. 

विशेषतः आर्द्रता वाढल्यास जळगावच्या केळीवर 'करपा' रोगाचा प्रादुर्भाव होतो, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. मात्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांत जास्त आर्द्रता असूनही तेथील काही वाण करपा रोगाला बळी पडत नाहीत. याच भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून, त्या ठिकाणच्या जाती जळगावच्या वातावरणात तग धरू शकतात का, यावर सध्या सखोल संशोधन सुरू आहे.

शेतकऱ्यांचा फायदा हेच मुख्य ध्येय'कमी वेळेत आणि कमी खर्चात शेतकऱ्यांना अधिक फायदा कसा मिळवून देता येईल, यावर आमचा भर आहे,' असे वरिष्ठ संशोधक सहाय्यक चंद्रशेखर गुळवे यांनी सांगितले. या ८० वाणांपैकी जे वाण जळगावच्या मातीशी आणि हवामानाशी सुसंगत ठरतील, त्यांची शिफारस भविष्यात शेतकऱ्यांसाठी केली जाणार आहे.

या वाणांची केली लागवडया ठिकाणी एकूण ८० प्रकारच्या वाणांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये सकल नागपूर, अमृत सागर, हर्षल, एच २, चकीया, पुवन, राजेली, सोनीयाल, कुनन, साहील केला. ने पुवन, कोठीया, अलुकेल, वसई, ब्लब जावा, रे केल, बीसीबी १, कल्लू मोथान, सफेद वेलची, रसथाली, चंपा, चीनीया, लाल केळी, मास, लेडीज फिंगर, अग्नीमल भोग या वाणांचा समावेश आहे.

हवामानातील बदलांशी जुळवून घेणारे काही वाण जरी जळगावच्या वातावरणात यशस्वी झाले, तर भविष्यात येथील केळी उत्पादकांसाठी ही मोठी क्रांती ठरेल.- डॉ. अरुण भोसले, वरिष्ठ संशोधक, केळी संशोधन केंद्र.

English
हिंदी सारांश
Web Title : Can Tamil Nadu, West Bengal Banana Varieties Thrive in Jalgaon?

Web Summary : Jalgaon's banana research explores diverse varieties, including Tamil Nadu and West Bengal strains, to combat climate change impacts and diseases like 'Karpa', aiming to benefit local farmers with resilient options.
टॅग्स :केळीशेती क्षेत्रशेतकरीपीक व्यवस्थापन