Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sugarcane Revolution : धाराशिवमध्ये उसाचा विक्रमी गोडवा; दुष्काळी जिल्हा ठरला नंबर वन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 11:59 IST

Sugarcane Revolution : अवर्षणासाठी ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्याने यंदा ऊस उत्पादनात ऐतिहासिक कामगिरी करत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. केवळ ६०४ मिमी पावसातही ६२ लाख टन गाळप करून जिल्ह्याने मराठवाड्यात अव्वल स्थान मिळवले आहे.(Sugarcane Revolution)

चेतन धनुरे 

अवर्षणासाठी ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्याने यंदा ऊस उत्पादनात उल्लेखनीय कामगिरी करत मराठवाड्यात अव्वल स्थान पटकावले आहे.(Sugarcane Revolution) 

केवळ ६०४ मिमी इतकी सरासरी पर्जन्यमान असतानाही जिल्ह्याने तब्बल ६२ लाख ११ हजार ७७० मेट्रिक टन उसाचे गाळप करून 'साखर क्रांती' घडवून आणली आहे.(Sugar Revolution)

सात वर्षांत अडीच पट वाढले ऊस क्षेत्र

गेल्या सात वर्षांत पावसाने काही प्रमाणात साथ दिल्याने आणि सिंचन साधनांमध्ये सुधारणा झाल्याने ऊस लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढले. परिणामी, जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या आणि गाळप क्षमता दोन्ही वाढल्या.

यंदाच्या हंगामात १४ सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप केले, ज्यामुळे धाराशिवने मराठवाड्यात पहिला क्रमांक पटकावला.

लातूर दुसऱ्या क्रमांकावर

धाराशिवनंतर लातूर जिल्ह्याने ५५ लाख ३१ हजार २५० मेट्रिक टन उसाचे गाळप करून दुसरे स्थान मिळवले आहे. 

याशिवाय बीड, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांनीही मोठ्या प्रमाणात गाळप नोंदवले आहे.

मराठवाड्यात जवळपास ३ कोटी मेट्रिक टन गाळप

संपूर्ण मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामात तब्बल २ कोटी ९९ लाख ६० हजार १५९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. यामधून २ कोटी ६१ लाख ३३ हजार ३६० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.

उत्पादकतेत मोठी वाढ

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब केल्यामुळे ऊस उत्पादकतेत लक्षणीय वाढ झाली आहे.

२०१८-१९ मध्ये उत्पादकता : ५१ मेट्रिक टन/हेक्टरी

२०२४-२५ मध्ये उत्पादकता : ६७ मेट्रिक टन/हेक्टरी

विशेष म्हणजे तुळजापूर तालुक्यात काही शेतकऱ्यांनी एआय (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादकता तब्बल १२० मेट्रिक टनांपर्यंत नेली आहे.

'स्मार्ट शेती'मुळे शक्य झाली प्रगती

ड्रिप सिंचन, सुधारित वाण, माती परीक्षण, तसेच तंत्रज्ञानाचा वापर यामुळे कमी पावसाच्या प्रदेशातही ऊस शेती यशस्वी ठरत आहे. 

शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने पाणी व्यवस्थापन केल्याने उत्पादनात सातत्याने वाढ होत आहे.

अवर्षणग्रस्त ओळख असलेल्या धाराशिवने ऊस उत्पादनात केलेली ही झेप ही राज्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. 

कमी पर्जन्यमान असूनही तंत्रज्ञान, नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर 'साखर क्रांती' घडवून आणता येते, हे धाराशिवने सिद्ध करून दाखवले आहे.

हे ही वाचा सविस्तर : AI Sheti : शेतकऱ्याच्या खिशात 'एआय' शेती; जालन्याचा स्मार्ट प्रयोग वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

अधिक वाचा : AI Sugarcane Farming : 'एआय' सांगते किती पाणी, किती वेळ; शेतकऱ्याला थेट मेलवर मिळतो शेती सल्ला

English
हिंदी सारांश
Web Title : Dharashiv's Sugarcane Revolution: Drought-hit District Becomes Marathwada's Top Producer

Web Summary : Despite low rainfall, Dharashiv leads Marathwada in sugarcane production with 6.2 million metric tons, driven by improved irrigation, technology and smart farming. Sugar production increased significantly. Farmers in Tuljapur have achieved productivity of 120 metric tons per hectare using AI.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीऊसधाराशिव