शिरीष शिंदे
बीड जिल्ह्यात सध्या ऊसतोडणी हंगाम जोरात सुरू असून, यंदा मजुरांच्या तीव्र टंचाईवर मात करण्यासाठी शेतकरी आणि साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणावर यांत्रिक ऊसतोडणी (Harvester) स्वीकारली आहे. (Sugarcane Harvesting)
परिणामी, पारंपारिक पद्धतीने चार दिवस लागणारे ऊसतोडीचे काम आता अवघ्या ४ ते ५ तासांत पूर्ण होत असून, यामुळे ऊसतोडणीला वेग मिळाला आहे.जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांकडे एकूण १७० हार्वेस्टर उपलब्ध झाल्याने ऊस हंगामात नवे चित्र दिसून येत आहे.(Sugarcane Harvesting)
जिल्ह्यातील माजलगाव आणि गेवराई तालुक्यांमध्ये, विशेषतः गोदावरी नदीच्या काठावरील भागात, उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. दरवर्षी या भागात ऊसतोडीसाठी बाहेरून येणाऱ्या मजुरांच्या टोळ्यांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागत होते.(Sugarcane Harvesting)
मात्र, यंदा मजुरांची कमतरता, वाढलेले मजुरीचे दर आणि काही ठिकाणी वाहनधारकांकडून होणारी आर्थिक फसवणूक यामुळे शेतकरी आणि साखर कारखानदारांनी हार्वेस्टरला प्राधान्य दिले आहे.(Sugarcane Harvesting)
वेळ, श्रम आणि खर्चाची मोठी बचत
पारंपारिक पद्धतीने एक एकर ऊस तोडण्यासाठी साधारणतः ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागत होता. यामध्ये मजुरांची उपलब्धता, वाहतूक व्यवस्था आणि हवामानाचा मोठा परिणाम होत असे.
मात्र, आधुनिक हार्वेस्टरच्या मदतीने एकाच दिवसात, काही तासांत ऊसतोड पूर्ण होत आहे. त्यामुळे ऊस त्वरित कारखान्यापर्यंत पोहोचत असून, वजन घट होण्यापूर्वीच गाळपासाठी जात असल्याने शेतकऱ्यांना थेट आर्थिक फायदा होत आहे.
सेंद्रिय खताचा लाभ, रासायनिक खर्चात कपात
हार्वेस्टरद्वारे ऊसतोडणी करताना उसाचा पालापाचोळा शेतातच बारीक करून टाकला जातो. हा पालापाचोळा कुजून जमिनीत मिसळल्यामुळे सेंद्रिय खताचा पुरवठा होतो.
परिणामी, पुढील खोडवा पिकाला नैसर्गिक पोषण मिळत असून, रासायनिक खतांवरील खर्चात घट होत आहे. सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे जमिनीची सुपीकताही सुधारत असल्याचा अनुभव अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत.
मजुरांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह
एकीकडे यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांचे काम सुलभ झाले असले, तरी दुसरीकडे ऊसतोड मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बीड जिल्ह्यातून दरवर्षी लाखो मजूर ऊसतोडीसाठी स्थलांतर करतात.
मात्र, हार्वेस्टरचा वाढता वापर पाहता भविष्यात या मजुरांना रोजगार मिळेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे यांत्रिकीकरणासोबतच पर्यायी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची गरज असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.
कोणाकडे किती हार्वेस्टर?
बीड जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांकडे खालीलप्रमाणे हार्वेस्टर उपलब्ध आहेत.
डी.व्ही.पी. कम्युडीटी एक्सपोर्ट संचलित गजानन सहकारी साखर कारखाना – १
जयभवानी सहकारी साखर कारखाना – १५
लोकनेते सुंदररावजी सोळुंके सहकारी साखर कारखाना – ३५
छत्रपती सहकारी साखर कारखाना – १४
एनएसएल शुगर्स, युनिट नं. ३, पवारवाडी – ३७
अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना – १
येडेश्वरी ॲग्रो प्रो, पवनसुत नगर, आनंदगाव सारणी – ४०
गंगामाऊली अलाईड संचालित पद्मश्री डॉ. विखे पाटील साखर कारखाना – १६
ओंकार शुगर्स लिमिटेड – ११
शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद
सध्या कमी वेळात, पारदर्शक पद्धतीने आणि फसवणूक टाळून ऊसतोड होत असल्याने शेतकरी हार्वेस्टर पद्धतीचे स्वागत करताना दिसत आहेत.
येत्या काळात यांत्रिक ऊसतोडीचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता असून, बीड जिल्ह्यातील ऊसतोडीचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.