शिरीष शिंदे
बीड जिल्ह्यातील चालू उसाचा गाळप हंगाम सध्या जोरात सुरू असून, साखर कारखान्यांनी गाळपासोबतच शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचा रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) वेळेत देण्यावर भर दिला आहे. (Sugarcane FRP Payment)
जिल्ह्यातील सहकारी व खासगी अशा एकूण ९ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ११ हजार ८१४ शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल २७७ कोटी २२ लाख रुपये एफआरपी अदा केली आहे. (Sugarcane FRP Payment)
उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती कारखाना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.(Sugarcane FRP Payment)
गाळप हंगाम रंगात
यंदाच्या हंगामात बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळपाचा वेग वाढवला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांनी २१ लाख ६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे.
या गाळपात २० हजार ५७९ शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्यांना पुरवला आहे. वाढता उत्पादन खर्च, मजुरांची टंचाई आणि हवामानातील बदल या पार्श्वभूमीवर वेळेवर मिळणारी एफआरपी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.
गाळपात येडेश्वरी ॲग्रो आघाडीवर
गाळपाच्या बाबतीत केज तालुक्यातील येडेश्वरी ॲग्रो कारखान्याने आघाडी घेतली असून, या कारखान्याने आतापर्यंत ४ लाख ५९ हजार १८७ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्यापाठोपाठ माजलगाव तालुक्यातील एन.एस.एल. शुगर्स युनिट नं. ३ (पवारवाडी) या कारखान्याने ४ लाख ५७ हजार ९४८ मेट्रिक टन, तर छत्रपती सहकारी साखर कारखाना, सावरगाव (ता. माजलगाव) यांनी ३ लाख ६ हजार ८१५ मेट्रिक टन गाळप केले आहे.
एफआरपी वाटपातही तत्परता
शेतकऱ्यांसाठी सर्वात दिलासादायक बाब म्हणजे, कारखान्यांनी एफआरपी देयकांच्या वाटपातही तत्परता दाखवली आहे. जिल्ह्यातील एकूण २० हजार ५६२ ऊस उत्पादक शेतकऱ्यांपैकी ११ हजार ८४१ शेतकऱ्यांना त्यांची एफआरपी रक्कम अदा करण्यात आली आहे. आतापर्यंत २७७ कोटी २२ लाख रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.
एफआरपी वाटपातही येडेश्वरी साखर कारखान्याने आघाडी घेतली असून, या कारखान्याने आतापर्यंत ५७ कोटी ४२ लाख रुपयांची एफआरपी शेतकऱ्यांना अदा केली आहे. त्यापाठोपाठ धारूर तालुक्यातील लोकनेते सुंदररावजी सोळुंके सहकारी साखर कारखान्याने सुमारे ५५ कोटी ४ लाख रुपयांचे वाटप केले आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित ८ हजार ७४१ शेतकऱ्यांच्या खात्यावरही एफआरपीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वाढता उत्पादन खर्च, खत-बियाण्यांचे दर आणि मजुरांची कमतरता यामुळे शेतकरी आधीच अडचणीत असताना, साखर कारखान्यांकडून वेळेत होणारे हे आर्थिक वाटप ग्रामीण अर्थव्यवस्थेला काहीसा हातभार लावणारे ठरणार आहे.
पुढील काळात गाळप वाढणार
हंगाम अजूनही जोरात सुरू असल्याने येत्या काळात गाळपाचा एकूण आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
कारखान्यांकडून गाळप आणि एफआरपी वाटपाची गती कायम राहिल्यास शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप व एफआरपी तपशील
| अ.क्र. | कारखान्याचे नाव | गाळप (मेट्रिक टन) | ऊस उत्पादक शेतकरी संख्या | एफआरपी अदा शेतकरी | एफआरपी अदा रक्कम (रु. लाखात) |
|---|---|---|---|---|---|
| १ | डी.व्ही.पी. कम्युडीटी एक्सपोर्ट संचलित गजानन सहकारी साखर कारखाना, राजुरी (न) | ६०,८२६ | २१ | २१ | २३६.८२ |
| २ | जयभवानी सहकारी साखर कारखाना, गढी, ता. गेवराई | २,७२,६९० | २,९५८ | १,७६६ | ३,२९४.९९ |
| ३ | लोकनेते सुंदररावजी सोळुंके सहकारी साखर कारखाना, तेलगाव, ता. धारूर | १,८६,८१० | ३,३४३ | २,०५१ | ५,५०४.२० |
| ४ | छत्रपती सहकारी साखर कारखाना, सावरगाव, ता. माजलगाव | ३,०६,८१५ | १,६९० | १,०५९ | १,९५२.३६ |
| ५ | एनएसएल शुगर्स युनिट नं. ३, पवारवाडी, ता. माजलगाव | ४,५७,९४८ | ३,२१५ | २,५३३ | ३,९६९.९९ |
| ६ | अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना, अंबानगर, ता. अंबाजोगाई | ८४,१२० | ९३१ | ५२० | १,५४५.२० |
| ७ | येडेश्वरी ॲग्रो, पवनसुतनगर, आनंदगाव सारणी, ता. केज | ४,५९,१८७ | ४,४५७ | ४,४५७ | ५,७४२.१० |
| ८ | गंगामाउली अलाइड संचलित पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखाना, अशोकनगर, ता. केज | २,५९,१०८ | १,८५१ | १,४५२ | ३,९६९.९९ |
| ९ | ओंकार शुगर्स लिमिटेड, युनिट नं. ८, पांगरी, ता. परळी | ७१,०५६ | २१९ | ६७ | ५३०.८४ |