नांदेड : राज्यातील साखर कारखान्यांमध्ये ऊस वजन करताना काट्यात फेरफार होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींना आता राज्य सरकारने गांभीर्याने घेतले आहे. ऊस वजन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी 'वैध मापन शास्त्र विभागा'च्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. (Sugarcane Crushing)
या समितीला १२ मार्चपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यामुळे साखर कारखान्यांच्या वजन काट्यांवरील मनमानीला लगाम बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.(Sugarcane Crushing)
दरवर्षी तक्रारी, तरीही 'दोषमुक्त' अहवाल
दरवर्षी गळीत हंगाम सुरू होताच प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडे ऊस वजनाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येतात.
अनेक शेतकरी काट्यात फेरफार करून ऊसाचे कमी वजन दाखवले जात असल्याचा आरोप करतात. मात्र दुसरीकडे वैध मापन शास्त्र विभागाकडून कारखान्यांचे काटे 'दोषमुक्त' असल्याचा अहवाल दिला जातो.
यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि अधिकृत अहवाल यामध्ये मोठी विसंगती निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. हीच विसंगती दूर करण्यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेली समिती सखोल अभ्यास करणार आहे.
काटे 'ऑनलाइन' जोडण्याची शक्यता
यावेळी केवळ कागदोपत्री तपासणीवर न थांबता आधुनिक तांत्रिक उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे. राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजन काटे थेट सर्व्हरशी ऑनलाइन जोडण्याचा प्रस्ताव समितीसमोर आहे.
यामुळे काट्यामध्ये छेडछाड केल्यास ती लगेच सिस्टिममध्ये नोंद होईल आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्याची माहिती मिळेल. तसेच सध्याच्या कार्यपद्धतीत (SOP) बदल करून अधिक सक्षम व पारदर्शक व्यवस्था लागू करण्याबाबतही समिती विचार करत आहे.
चौकशी समितीची रचना
राज्य सरकारने स्थापन केलेल्या या समितीत खालील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे –
अध्यक्ष: सु. ह. चाटे – सह नियंत्रक, संभाजीनगर विभाग
उपाध्यक्ष: डी. पी. पवार – उप नियंत्रक, सांगली
सदस्य सचिव: डी. के. शेजवल – निरीक्षक, वाघोली
सदस्य: आर. पी. टाळकुटे – निरीक्षक, बारामती
समितीचे अध्यक्ष सु. ह. चाटे यांनी सांगितले की, सध्याच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवण्यात येणार आहेत.
तांत्रिक बदलांमुळे वजनातील दोष त्वरित समोर येतील आणि राज्यातील सर्व साखर कारखान्यांवर समितीची नजर राहणार आहे.
शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी
ऊस वजन करताना शेतकऱ्यांनी काही गोष्टींची खात्री करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
* काट्याचे प्रमाणीकरण तपासा
काट्यावर वैध मापन शास्त्र विभागाचे चालू वर्षाचे सील आणि प्रमाणपत्र आहे का, हे पाहावे.
* झिरो सेटिंग तपासा
ट्रॅक्टर किंवा ट्रक काट्यावर चढवण्यापूर्वी काटा '०.००' वर आहे का, याची खात्री करावी.
* वजनाची पावती घ्या
वजन झाल्यानंतर संगणकीय पावती त्वरित घ्यावी. त्यावर वेळ, दिनांक आणि वाहन क्रमांक तपासावा.
* तफावत आढळल्यास तक्रार करा
वजनात मोठी तफावत वाटल्यास साखर आयुक्त कार्यालय किंवा स्थानिक वैध मापन शास्त्र विभागाकडे तक्रार नोंदवावी.
पारदर्शकतेकडे मोठे पाऊल
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. काट्यातील संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि स्वतंत्र समितीची देखरेख यामुळे ऊस वजन प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Web Summary : Maharashtra government tackles sugarcane weight fraud with online system and committee. Farmers often complain about discrepancies. The system will ensure fair weight, transparency and prevent exploitation. Farmers need to check meter calibration, zero settings and get receipts.
Web Summary : महाराष्ट्र शासन ऊस वजनातील फसवणूक रोखण्यासाठी ऑनलाइन प्रणाली आणि समिती स्थापन करणार आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन पारदर्शक वजन सुनिश्चित केले जाईल. शेतकऱ्यांनी मीटर कॅलिब्रेशन, झिरो सेटिंग तपासावे आणि पावती घ्यावी.