Stepchildren Property Rights : वयाच्या पन्नाशीचं एक जोडपं मध्यंतरी ऑफिसमध्ये आलं होतं. ते दोघंही घटस्फोटित आहेत. महिलेला पहिल्या लग्नातून एक मुलगा आहे. सध्या ही दोघंही लिव्ह इनमध्ये राहतात आणि लवकरच लग्न करण्याचा त्यांचा विचार आहे. पण दुसरं लग्न झालं तर पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलाला होणाऱ्या नवऱ्याच्या मिळकतीमध्ये हिस्सा मिळेल का? पहिलं लग्न झालं तेव्हा जी काही मिळकत त्या महिलेने घेतली असेल तिच्यावर तिच्या आधीच्या नवऱ्याचा हक्क राहील की होणाऱ्या नवऱ्याचा असे एक ना अनेक प्रश्न त्या दोघांपुढे होते.
हिंदू वारसा कायदा कलम १४ अन्वये महिलांना एखादी मिळकत वारसाने, वाटपाने, पोटगी किंवा पोटगीच्या फरकापोटी, मृत्यूपत्र किंवा बक्षीसपत्राने, खरेदीने, स्त्रीधन किंवा इतर कोणत्याही मार्गाने कोणाकडूनही मिळाल्यास ती महिला अशा मिळकतींची संपूर्ण मालक होते. तहहयात राहण्याचा हक्क मिळाला असेल ती मालमत्ता मात्र अपवाद !
हे उदाहरण समजून घेऊयात या जोडप्याच्या केसमध्ये या महिलेची पहिल्या लग्नाच्या वेळी घेतलेल्या स्वतःच्या मिळकतीचा उपभोग कसा घ्यावा, हा निर्णय सर्वतोपरी त्या महिलेचा असणार होता. तिच्या हयातीत ती मालमत्ता कशी तबदिल (ट्रान्सफर) करावी, याबाबतचा निर्णय ती स्वतः घेऊ शकते. सगळ्यात सोपं आणि तुलनेने कमी खर्चाचा दस्त म्हणजे मृत्युपत्र करून ठेवू शकते आणि स्वतःच्या इच्छेप्रमाणे कोणालाही ती मिळकत मृत्युपश्चात देऊ शकते, असा सल्ला त्या महिलेला दिला.
केवळ लग्न झालं म्हणून जोडीदारांना एकमेकांच्या मिळकतीवर आपोआप हक्क मिळत नाही. नवरा बायको असले तरी आधी ते स्वतंत्र व्यक्ती असतात. या जोडप्याच्या केसमध्ये घटस्फोट झाल्यामुळे त्या महिलेच्या एकटीच्या मालकीच्या मिळकतीमध्ये पहिल्या नवऱ्याला काहीच हक्क मिळणार नाही आणि घटस्फोटानंतर तर पहिल्या नवऱ्याचा संबंधच संपला.
सावत्र मुलांचं काय?सावत्र मूल या संकल्पनेचा उल्लेख हिंदू वारसा कायद्यात आढळून येत नाही. सध्याच्या काळात अशी नवीन कौटुंबिक समीकरणं दिसायला लागली आहेत. घटस्फोट हा नवरा-बायकोच्या नात्याचा होतो, पण त्या दोन्ही व्यक्ती आयुष्यभर त्यांच्या मुलांचे आई-वडील राहतातच. दुसऱ्या जोडीदाराला आधीच्या लग्नापासून झालेलं मूल असेल तर त्या मुलाला आपल्या आई किंवा वडिलांच्या नवीन जोडीदाराच्या, म्हणजेच सावत्र आई-वडिलांच्या मिळकतीत कोणताही वारसा हक्क मिळत नाही.
दुसरं लग्न केलं म्हणून कुणीही त्या सावत्र मुलांचे कायदेशीर आई-वडील होत नाही. त्यासाठी त्यांना दत्तक घेणं गरजेचं असतं आणि कायदेशीरपणे दत्तक घेतलेली संतती हीच नैसर्गिक संतती समजली जाते. मात्र, कोण कोणाला दत्तक घेऊ शकतं याच्या तरतुदी हिंदू अडॉप्शन आणि मेंटेनन्स कायद्यात आहेत. त्यानुसार १५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना कायद्याप्रमाणे दत्तक घेता येत नाही. एखाद्या समाजात १५ वर्षापेक्षा मोठ्या वयाची मुले दत्तक घेण्याची मान्यताप्राप्त पद्धत असेल तर तो फक्त अपवाद !
म्हणूनच -समजा सदर जोडप्याचं लग्न झाल्यावर ती महिला मृत्युपत्र न करता मयत झाली तर तिची मिळकत तिच्या पहिल्या लग्नापासून झालेला मुलगा आणि दुसरा नवरा यांच्यामध्ये समानरित्या विभागली जाईल. दुसरं लग्न व्हायच्या आधीच त्या महिलेचं काही बरं-वाईट झालं तर मात्र तिचा मुलगा हा एकटाच तिचा वारस ठरेल.
दुसरं लग्न झालं असेल तर मात्र दुसऱ्या नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर या पत्नीकडून त्याला मिळालेला हिस्साही त्याच्या क्लास १ वारसांना म्हणजेच ती स्वतः आणि दुसऱ्या नवऱ्याची आई हयात असल्यास तिला समानपणे विभागून मिळेल. बायकोच्या पहिल्या लग्नापासून झालेल्या म्हणजेच त्या पुरुषाच्या सावत्र मुलाला काहीही हक्क मिळणार नाही.
त्या जोडप्याला मी वेळ न दवडता दोघांनीही तज्ज्ञ वकिलांकडून वेळीच मृत्यूपत्र करुन घ्यावं आणि ते रजिस्टर करून ठेवावं हा सल्ला दिला आणि तो त्यांना मनोमन पटलाही.-ॲड. रोहित एरंडे
Web Summary : Stepchildren lack inheritance rights to their stepparents' property unless legally adopted. Hindu law dictates inheritance; remarriage doesn't automatically grant rights. Wills are crucial for property distribution. A child from a first marriage inherits from their parent, not the stepparent.
Web Summary : सौतेले बच्चों को अपने सौतेले माता-पिता की संपत्ति पर विरासत का अधिकार नहीं होता जब तक कि वे कानूनी रूप से गोद न लिए जाएं। हिंदू कानून उत्तराधिकार को निर्धारित करता है; पुनर्विवाह स्वचालित रूप से अधिकार नहीं देता है। संपत्ति वितरण के लिए वसीयत महत्वपूर्ण है। पहले विवाह से एक बच्चा अपने माता-पिता से विरासत में मिलता है, सौतेले माता-पिता से नहीं।