Join us
Daily Top 2Weekly Top 5

Solar Pump : शेतीत सौरऊर्जेचा उजेड; शेतकऱ्यांना सौरपंपाचा लाभ वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 17:30 IST

Solar Pump : रात्रीच्या अंधारात पाणी आणि दिवसा विजेसाठीची धडपड आता थांबतेय. 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेची नागपूर जिल्ह्यात युद्धपातळीवर अंमलबजावणी सुरू असून, आतापर्यंत तब्बल ५०८ शेतकऱ्यांच्या शेतात सौरपंप कार्यान्वित झाले आहेत. (Solar Pump)

Solar Pump : राज्यात रब्बी हंगाम सुरू असताना सौर कृषिपंपांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच, नागपूर जिल्ह्याने 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेच्या अंमलबजावणीत आघाडी घेतली आहे. (Solar Pump)

महावितरणतर्फे ही योजना जिल्ह्यात अत्यंत पारदर्शक, नियोजनबद्ध आणि वेगाने राबवली जात असून, आतापर्यंत ५०८ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप यशस्वीरीत्या कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सौर ऊर्जेच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करताना दिसत आहेत.(Solar Pump)

पारदर्शक प्रक्रिया, शेतकऱ्यांचा वाढता विश्वास

महावितरणने या योजनेची अंमलबजावणी करताना पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. सौरपंपासाठी शेतकऱ्यांनी भरलेली अनामत रक्कम थेट शासनाकडे सुरक्षित ठेवली जात आहे. 

अर्जाची छाननी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना स्वतः च्या पसंतीनुसार पुरवठादार निवडण्याची मुभा देण्यात येत आहे. पुरवठादाराची निवड, तांत्रिक तपासणी आणि आवश्यक मंजुरी पूर्ण होताच विनाविलंब सौरपंप बसविण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे. 

जिल्ह्यातील कामकाजाचा नियमित आढावा घेण्यासाठी महावितरणकडून पुरवठादारांच्या बैठका घेतल्या जात असून, त्यामुळे अंमलबजावणीत गती आली आहे.

नागपूर जिल्ह्यातील सौरपंप योजनेची सद्यस्थिती

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील योजनेची स्थिती पुढीलप्रमाणे आहे

एकूण अर्ज : १,१०५

ऑनलाइन भरणा पूर्ण : १,०७२

छाननी पूर्ण : १,२४९

मंजूर अर्ज : ९९३

छाननी प्रलंबित : ३३

कार्यान्वित सौरपंप : ५०८

अर्ध्याहून अधिक मंजूर अर्जधारक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सौरपंप मिळाल्याने जिल्ह्यात समाधानाचे वातावरण आहे.

६० दिवसांत सौरपंप देण्याचे उद्दिष्ट

शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी सिंचनासाठी शेतात जावे लागू नये, तसेच दिवसा खात्रीशीर वीज मिळावी, या उद्देशाने महावितरणने अर्ज मंजुरीनंतर अवघ्या ६० दिवसांत सौर कृषिपंप उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

यामुळे रात्री जंगली श्वापदांचा धोका टळत असून, दिवसा सिंचन करणे सोपे झाले आहे. शेतकऱ्यांच्या वेळेची बचत होत असून, उत्पादन खर्चातही घट होत आहे.

रब्बी पिकांना दिलासा, सिंचनाची चिंता नाही

राज्यातील काही भागांमध्ये सौरपंपांच्या प्रतीक्षेमुळे पिकांच्या नुकसानीची चिंता व्यक्त होत असली, तरी नागपूर जिल्ह्यातील परिस्थिती दिलासादायक आहे. जिल्ह्यात पारंपरिक वीजपुरवठा असलेल्या कृषिपंपांची संख्या मोठी असल्याने गहू, हरभरा यांसारख्या रब्बी पिकांच्या सिंचनावर कोणताही धोका निर्माण झालेला नाही.

सौरपंपामुळे 'दिवसा वीज, रात्री पाणी' या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.

शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

नागपूर जिल्ह्यात 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेची प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू आहे. पात्र शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या योजनेत सहभागी होऊन सौर ऊर्जेचा लाभ घ्यावा, जेणेकरून शेती अधिक शाश्वत, सुरक्षित आणि समृद्ध होईल, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

सौर ऊर्जेच्या वापरामुळे वीजबिलाचा बोजा कमी होत असून, पर्यावरणपूरक शेतीकडे जिल्ह्याची वाटचाल सुरू झाली आहे. नागपूर जिल्ह्याचा हा मॉडेल राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे चित्र आहे.

हे ही वाचा सविस्तर : Solar Scheme : प्रधानमंत्री घरकुल लाभार्थ्यांना सोलर ऊर्जेचा 'पुश बॅक'; इतक्या हजार रुपयांचे मिळणार अनुदान वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Solar Pumps Light Up Farms; Farmers Benefit in Nagpur District

Web Summary : Nagpur district leads in solar pump implementation, empowering farmers. 508 farmers have successfully installed solar pumps, fostering self-reliance. Transparent processes and swift installation within 60 days are key, boosting Rabi crops and farmer incomes.
टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतकरीशेती