Join us
Daily Top 2Weekly Top 5

Solar Pump Case : सौर पंप असूनही वीजबिलाचा 'शॉक'; महावितरणच्या गलथान कारभार उघड वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 11:43 IST

Solar Pump Case : शासन सौरऊर्जेचा प्रचार करत असताना प्रत्यक्षात सौर कृषिपंप वापरणाऱ्या शेतकऱ्यालाच वीजबिलाचा फटका बसत असल्याचा धक्कादायक प्रकार परतवाडा परिसरात उघडकीस आला आहे. शेतात महावितरणची वीज जोडणी नसतानाही नऊ वर्षांपासून वीज देयके पाठवली जात असल्याने संतप्त शेतकऱ्याने प्रशासनाविरोधात बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. (Solar Pump Case)

Solar Pump Case : एकीकडे शासन सौरऊर्जेच्या वापराचा जोरदार प्रचार करत असताना, दुसरीकडे प्रत्यक्षात सौर कृषिपंपाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यालाच वीजबिलाचा शॉक बसल्याचा धक्कादायक प्रकार अचलपूर तालुक्यात उघडकीस आला आहे. (Solar Pump Case)

शेतात कधीच महावितरणची वीज जोडणी नसतानाही, तब्बल नऊ वर्षांपासून वीज देयके पाठवून शेतकऱ्याची आर्थिक आणि मानसिक छळवणूक केली जात असल्याचा आरोप येसूर्णा येथील शेतकरी संजय काळे यांनी केला आहे. या संतापजनक प्रकाराविरोधात त्यांनी अचलपूर महावितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.(Solar Pump Case)

सौर पंप बसवूनही वीज ग्राहक म्हणून नोंद कायम

संजय काळे यांनी २०१२ साली शेतासाठी वीज जोडणी मिळावी म्हणून महावितरणकडे अर्ज केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी ६ हजार २०० रुपये आगाऊ रक्कम भरली. 

मात्र, अनेक वर्षे वीज जोडणी मिळाली नाही. अखेर कंटाळून त्यांनी २०१६ मध्ये शासनाच्या सौर कृषिपंप योजनेअंतर्गत ३६ हजार रुपये भरून सौर पंप बसवून घेतला.

१८ ऑक्टोबर २०१६ रोजी सौर पंप कार्यान्वित झाला. नियमानुसार त्यांना वीज जोडणीसाठी भरलेली रक्कम परत मिळणे आणि महावितरणच्या ग्राहक यादीतून नाव वगळणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात तसे न करता, कागदोपत्री वीज जोडणी कायम ठेवत दरमहा वीजबिले पाठवण्याचा सपाटा सुरू ठेवण्यात आला.

शेतात वायरही नाही, तरी बिल कसे?

काळे यांच्या शेतात आजही वीज खांब नाही, वायर नाही आणि मीटर नाही, तरीदेखील महावितरणकडून नियमित वीज देयके पाठवली जात आहेत. 'शेतात वीजच नाही, मग बिल येते तरी कसे?' असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

गेल्या नऊ वर्षांपासून आपली ६ हजार २०० रुपयांची रक्कम परत मिळावी म्हणून ते महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. यासाठी त्यांनी १० जून २०१६ रोजी रीतसर अर्जही सादर केला, मात्र अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासनेच मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.

महावितरणच्या कारभारावर शेतकऱ्यांचा संताप

या प्रकारामुळे अचलपूर तालुक्यातील शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही सावळी येथील एका शेतकऱ्याला सौरऊर्जा संयंत्रासाठी नाहक त्रास सहन करावा लागल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतरच दुसऱ्या दिवशी कामकाज मार्गी लागले होते. त्यामुळे यावेळीही महावितरण प्रशासन काय भूमिका घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आठ दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा आंदोलन तीव्र

या प्रकरणात नेमका तांत्रिक घोळ काय आहे, याचा आठ दिवसांत लेखी खुलासा करावा तसेच ६,२०० रुपये व्याजासह परत द्यावेत, अशी ठाम मागणी संजय काळे यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. अन्यथा कार्यालयासमोर उपोषण अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सौरऊर्जेला प्रोत्साहन देणाऱ्या शासनाच्या धोरणांवरच अशा घटनांमुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, महावितरणच्या निष्काळजी कारभारामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Solar Pump Scheme : सौर कृषी पंप योजनेत अडथळेच अडथळे; शेतकरी तक्रारींच्या प्रतीक्षेत वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतकरीशेती