Join us
Daily Top 2Weekly Top 5

Smart Solar Scheme : हरित ऊर्जेकडे वाटचाल; 'स्मार्ट सौर योजने'चा लाभ कोणाला? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:00 IST

Smart Solar Scheme : शून्य ते १०० युनिट वीज वापरणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी राज्य शासनाची स्मार्ट सौर योजना वरदान ठरत आहे. या योजनेत सौर प्रकल्पाच्या खर्चावर ९५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळत असून, लाभार्थ्यांना अत्यल्प रक्कम भरावी लागणार आहे. जाणून घ्या सविस्तर (Smart Solar Scheme)

Smart Solar Scheme : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दारिद्रयरेषेखालील कुटुंबे तसेच कमी वीज वापर करणाऱ्या नागरिकांसाठी राज्य शासनाने 'स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलार' अर्थात 'स्मार्ट सौर योजना' सुरू केली आहे. (Smart Solar Scheme)

या योजनेमुळे गरीब व गरजू कुटुंबांना वीज बिलातून मोठा दिलासा मिळणार असून, त्यांना विजेबाबत स्वयंपूर्ण बनविण्याचा शासनाचा उद्देश आहे. अकोला परिमंडळातील पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे.(Smart Solar Scheme)

महावितरणमार्फत योजना राबविण्यात येणार

ही योजना महावितरण (MSEDCL) मार्फत राबविण्यात येत असून, शून्य ते १०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या पात्र घरगुती ग्राहकांच्या घरांच्या छतावर १ किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प बसविण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना तसेच राज्य शासनाच्या स्मार्ट सौर योजना यांच्या माध्यमातून अतिरिक्त अनुदान देण्यात येणार आहे.

८० ते ९५ टक्क्यांपर्यंत अनुदान

या योजनेअंतर्गत सौर प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी ८० ते ९५ टक्के खर्च शासनाकडून अनुदान स्वरूपात दिला जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना अत्यल्प रक्कम भरून सौर प्रकल्प बसविता येणार आहे. विशेषतः प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेतलेल्या कुटुंबांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.

वीज बचत, उत्पन्नवाढ आणि पर्यावरण संरक्षण

आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्रयरेषेखालील कुटुंबांना सोलार रूफटॉप यंत्रणा बसविण्यास प्रोत्साहन देऊन

विजेबाबत स्वयंपूर्ण बनविणे,

अतिरिक्त निर्मित वीज विक्रीतून उत्पन्नाचे साधन निर्माण करणे,

पर्यावरणपूरक वीज निर्मितीला चालना देणे,

हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

केवळ २,५०० रुपयांपासून सौर प्रकल्प

महावितरणच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना सौर प्रकल्पासाठी केवळ २ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपये इतकीच रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे गरीब व गरजू कुटुंबांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

अकोला परिमंडळातील नागरिकांना मोठा लाभ

अकोला परिमंडळातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले असून, वीज बिलमुक्त घर आणि हरित ऊर्जेचा वापर ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.

कोण पात्र आहेत?

* आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)

* दारिद्रयरेषेखालील (BPL) कुटुंबे

* ० ते १०० युनिटपर्यंत वीज वापर करणारे घरगुती ग्राहक

* स्वतः च्या घराचे छत असलेले लाभार्थी

* प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी (प्राधान्य)

* महावितरणचे घरगुती वीज कनेक्शन असणे आवश्यक

योजनेत काय मिळते?

घराच्या छतावर १ किलोवॅट क्षमतेचा सोलार रूफटॉप प्रकल्प

वीज निर्मितीसाठी आवश्यक सर्व यंत्रणा (पॅनल, इन्व्हर्टर, मीटर)

अनुदान किती मिळते?

सौर प्रकल्पाच्या एकूण खर्चावर ८० ते ९५ टक्क्यांपर्यंत अनुदान

केंद्र शासन (पीएम सौर घर योजना) + राज्य शासन (स्मार्ट सौर योजना) यांचे संयुक्त अनुदान

लाभार्थ्यांचा खर्च किती?

१०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्यांना

केवळ २,५०० ते ७,५०० रुपये इतकीच रक्कम भरावी लागणार

उर्वरित खर्च शासनाकडून अनुदान स्वरूपात दिला जाणार

योजनेचे फायदे

* वीज बिलात मोठी बचत / जवळपास शून्य वीज बिल

* स्वतःची वीज निर्मिती – विजेवर अवलंबित्व कमी

* अतिरिक्त वीज ग्रीडला विकून उत्पन्नाची संधी

* पर्यावरण संरक्षण व कार्बन उत्सर्जनात घट

* गरीब कुटुंबांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा

अर्ज कसा करावा?

* महावितरण किंवा पीएम सुर्यघर पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी

* आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे

* पात्रता तपासणी

* मान्यताप्राप्त विक्रेत्यामार्फत सोलार प्रकल्प बसविणे

* नेट मीटर बसवून वीज वापर सुरू

आवश्यक कागदपत्रे कोणती?

* आधार कार्ड

* रेशन कार्ड / उत्पन्न प्रमाणपत्र

* वीज बिलाची प्रत

* घराच्या मालकीचे कागद

* बँक खाते तपशील

* पीएम आवास योजनेचा लाभ असल्यास प्रमाणपत्र

महावितरणचा सल्ला

पात्र लाभार्थ्यांनी दलालांच्या भूलथापांना बळी न पडता अधिकृत संकेतस्थळ किंवा महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा सविस्तर :Solar Pump Scheme : सौर कृषी पंप योजनेत अडथळेच अडथळे; शेतकरी तक्रारींच्या प्रतीक्षेत वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Smart Solar Scheme: Green Energy for Needy; Benefits & Details

Web Summary : Maharashtra's Smart Solar Scheme offers subsidized rooftop solar plants to low-income families using under 100 units of electricity. Beneficiaries in Akola division get up to 95% subsidy, reducing costs to ₹2,500-₹7,500. Aims for self-sufficiency, income via surplus energy sales, and environmental protection.
टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतकरीशेती