सागर कुटे
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत (Shetkari Apghat Yojana) बुलढाणा जिल्ह्यातील २२३ शेतकरी वारसांचे प्रस्ताव अद्याप मार्गी लागलेले नाहीत. या प्रस्तावांसाठी कृषी विभागाने राज्य शासनाकडे तब्बल २.०९ कोटी रुपयांची मागणी केली आहे. (Shetkari Apghat Yojana)
या प्रस्तावांना मदत मिळावी यासाठी २ कोटी रुपयांहून अधिक निधीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. निधी मंजुरीच्या प्रतिक्षेत असलेली ही कुटुंबे आता शासनाच्या सकारात्मक निर्णयाकडे आशेने पाहत आहेत. (Shetkari Apghat Yojana)
ही योजना अपघाती मृत्यू किंवा कायम अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत मृत शेतकऱ्याच्या वारसांना २ लाख रुपये तर अपंगत्व आल्यास १ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते. (Shetkari Apghat Yojana)
आतापर्यंत 'इतक्या' प्रस्तावांना मंजुरी
१९ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत जिल्ह्यात एकूण ४९९ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यापैकी ४०९ प्रस्तावांना तालुकास्तरीय समितीकडून मंजुरी देण्यात आली असून २९६ वारसांना एकूण ५.९५ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
शिल्लक प्रस्तावांचे काय?
उर्वरित २२३ पात्र प्रस्ताव सध्या शासनाच्या निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी जिल्हा कृषी विभागाने २.०९ कोटी रुपयांचा निधी प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. निधी मंजूर झाल्यानंतर या प्रस्तावांना लवकरच आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे.
विमा संरक्षणामध्ये समाविष्ट बाबी!
रस्ता व रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, विजेचा धक्का किंवा वीज पडून मृत्यू, किटकनाशक हाताळताना विषबाधा, खून किंवा नक्षलवादी हल्ला, उंचावरून पडणे, सर्पदंश / विंचूदंश, जनावरांच्या हल्ल्यामुळे जखमी होणे किंवा मृत्यू, दंगल व अन्य कोणतेही अपघात या बाबींचा समावेश असेल.
पात्रतेच्या अटी व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे!
* १० ते ७५ वयोगटातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी तसेच वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकरी कुटुंबातील कोणताही एक सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याचे पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती).
* ज्या नोंदीवरून अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव सातबारावर आले असेल, अशी संबंधित फेरफार नोंद (गाव नमुना नंबर ६-ड).
* शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गाव नमुना क्रमांक ६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, अपघाताच्या स्वरुपानुसार विहित केलेली इतर कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे. अटी व कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर अनुदान मिळते.
जिल्ह्यात एकूण ४९९ प्रस्ताव प्राप्त झाले. त्यातील ४०९ प्रस्तावांना तालुकास्तरीय समितीने मंजुरी दिली असून, त्यापैकी २९६ वारसांना एकूण ५.९५ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. उर्वरित २२३ प्रस्ताव शासनाकडे पाठवले आहेत. त्यांना लवकरच मदत मिळेल. - मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा