Join us

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप नाकारले, नेमकं कारण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 12:58 IST

Saur Pump Yojana : कृषिपंपासाठी वीज जोडणी मिळावी, यासाठी महावितरणकडे शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.

नाशिक : 'मागेल त्याला सौर कृषीपंप' अशी राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून, त्यासाठी शेतकऱ्यांना सौर कृषिपंपाकडे वळविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी कृषी वीजपंपासाठी अर्ज केले आहेत, अशा शेतकऱ्यांना या योजनेतून पंप देण्यासाठी आग्रह धरण्यात आला; मात्र या शेतकऱ्यांनी त्यास नकार दिल्याने जिल्ह्यातील ८८ शेतकऱ्यांनी भरलेली डिमांड रक्कम महावितरणने परत केले आहेत.

कृषिपंपासाठी वीज जोडणी मिळावी, यासाठी महावितरणकडे शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. अशी असंख्य प्रकरणे महावितरणकडे दाखल असून, यातील बहुतांश प्रकरणे अद्यापही पडून आहेत. सौर योजनेला प्राधान्य देण्यासाठी शेतकऱ्यांना 'सौर कृषीपंप' योजनेकडे वळविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. 

अशातच ज्यांनी पंपासाठी विजेची मागणी केली, अशा शेतकऱ्यांपुढे सौरऊर्जेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता; परंतु या शेतकऱ्यांनी तांत्रिक अडचणी सांगत वीज जोडणी देण्याची मागणी केली; मात्र त्यांची मागणी मान्य न होता त्यांनी भरलेली डिमांडची रक्कम परत करून त्यांना कृषी जोडणी देण्यास एकप्रकारे नकारच दिला आहे.

सर्वाधिक शेतकरी सटाण्यातजिल्ह्यात नाशिक आणि मालेगाव असे दोन मंडळे असून, नाशिक मंडळातील ६४ तर मालेगाव मंडळातील २४ अशा एकूण ८८ शेतकऱ्यांना पैसे परत करण्यात आले. यामध्ये सटाण्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक २३ इतकी आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे अर्ज सौर कृषी योजनेत समाविष्ट करण्यात आले.

अजूनही तोडगा नाहीराज्य शासनाच्या नव्या धोरणानुसार कृषिपंपांना पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा देणे जवळपास बंदच केले असून, त्यानुसार केंद्र सरकारच्या योजनेसुनार मागेल त्याला सौरपंप ही योजना राबविली जात आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी वारंवार वीज जोडणी मागणी करीत आंदोलने केली आहेत. मात्र, अजूनही त्याबाबत सकारात्मक तोडगा निघालेला नाही.

कृषिपंपांना सौरऊर्जेच्या कक्षेत आणण्यासाठी प्राधान्य दिले जात असल्याने ज्यांनी कृषी वीजपंपाची मागणी केली त्यांना सौरचा आग्रह धरण्यात आला. कृषी वीजपंपासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी ८८ शेतकऱ्यांनी नकार दिल्याने त्यांचे पैसे परत करण्यात आले तर उर्वरित २६९ शेतकरी सौरऊर्जेत समाविष्ट केले आहे.

Jamin Kharedi : तुमच्याकडे जमीन नाही पण नोंद सापडली तर जमीन नावावर होऊ शकते का? 

टॅग्स :कृषी योजनाशेतीशेतकरीशेती क्षेत्र