उन्मेष पाटील
रोजगार हमी योजनेतून (Rojagara Hami) ग्रामीण भागातील मजुरांना काम देण्याच्या उद्देशाने सुरुवात झाली. मात्र, प्रत्यक्षात मजुरांना सुविधा मिळणे दुरापास्त झाले आहे. (Rojagara Hami)
रोजगार हमी योजनेत कागदावर हजारो मजुरांची नोंद आहे, पण प्रत्यक्षात भर उन्हात राबणाऱ्या मजुरांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत.
धाराशिव जिल्ह्यात सध्या २,५२७ कामांवर २४,५०७ मजुरांची उपस्थिती दाखवली जात असली तरी त्यापैकी किती मजूर खरोखरच कामावर आहेत, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
एकीकडे ३५० ते ४०० रुपये देऊन ग्रामीण भागात शेतात कामे करायला मजूर मिळत नसताना दुसरीकडे जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामावर हजारो मजूर कागदावर दिसत आहेत.
हे ऑन रेकॉर्ड मजूर खरेच प्रत्यक्ष कामावर असतील तर तापमानाचा पारा ४०-४२ अंशांवर असताना त्यांना शासनाच्या वतीने सोयी सुविधा पुरविता येतात का? असा प्रश्नही आता उपस्थित केला जातोय.
उन्हाळ्यात शेतातील कामे कमी प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळावे या उदात्त हेतूने शासन रोजगार हमी योजनेतून सार्वजनिक तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनेतून कामे उपलब्ध करून देते.
या योजनेत मागील काही वर्षापासून राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या गुत्तेदार लॉबीने शिरकाव करून ही योजनाच हायजॅक केल्याने यातील बहुतांश कामे मजुरांच्या नावावर हे गुत्तेदार केल्याचे दाखवतात हे उघड सत्य आहे. त्याला प्रशासनातील काही अधिकारी कर्मचारी साथ देतात, कारण त्याशिवाय हे प्रकार होत नाहीत, हे खासगीत सर्वच मान्य करतात.
त्याबाबतच्या चौकशी, कार्यवाही प्रशासनस्तरावर सातत्याने चालूच असतात. हे प्रकार कधी थांबतील हे कोणीच सांगू शकणार नाही. मात्र, ज्याठिकाणी रोहयो कामावर खरेच मजूर उपस्थित असतील तेथे अशा कडक उन्हात म्हणजे तापमान चाळिशी पार गेल्यानंतर शासनाकडून मिळणाऱ्या सोयी-सुविधा पुरविल्या जातात का? याचीही दक्षता संबंधित विभागाने घेणे महत्त्वाचे आहे. त्या त्या सोयी-सुविधासाठी शासन वेगळ्या रकमेची तरतूद करते, हे विशेष.
काय पाहिजेत सुविधा ?
* कागदावरील मजुरांना सुविधांची गरज नाही, कारण ते कामावर येतच नाहीत. मात्र, जे मजूर खरोखर कामावर असतात त्यांना पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी निवारा, आरोग्यासाठी प्राथमिक सुविधा, आदी सुविधा देणे गरजेचे आहे.
* त्यासाठी शासन निधीची तरतूदही करते. मात्र, त्या सुविधा कोठे कामावर दिसून येत नाहीत. विशेष म्हणजे या सुविधा शासन पुरवते हे खऱ्या मजुरांना माहीत नाही.
जिल्ह्यात २४, ५०७ मजूर ऑन रेकॉर्ड
जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून ३७० गावांत २ हजार ५२७ कामांवर २४ हजार ५०७ मजूर उपस्थित असल्याची ऑन रेकॉर्ड नोंद शासनदरबारी आहे. यातील प्रत्यक्ष कामावर किती मजूर उपस्थित असतील, याची खातरजमा मात्र कोणी देत नाही.
तापमान चाळिशीपार, कसे होणार काम ?
कागदावर मजुरांची संख्या हजाराच्या घरात असली तरी प्रत्यक्षात कामावर असलेल्या मजुरांना या चाळिशीपार गेलेल्या तापमानाचा मोठा त्रास होतोय. त्यांना सुविधा मिळाल्या नाही तर ते काम कसे करतील? कामाचे उद्दिष्ट कसे पूर्ण होईल? हा प्रश्न आहेच
सर्वाधिक मजूर तुळजापूर तालुक्यात
धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक मजूर तुळजापूर तालुक्यात ८७ गावांत ७१७ कामांवर ७ हजार ४७८ एवढे ऑन रेकॉर्ड आहेत, तर सगळ्यात कमी ६ गावांत १८ कामांवर १६० मजूर ही उमरगा तालुक्याची नोंद आहे.
कोणत्या तालुक्यात किती मजूर ?
तालुका | मजूर |
भूम | ३९२० |
कळंब | ५७१३ |
लोहारा | ७९९ |
उमरगा | १६० |
धाराशिव | ३३५२ |
परंडा | १५३८ |
तुळजापूर | ७४७८ |
वाशी | १५४७ |
कळंब तालुक्यात चालू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामावर उपस्थित असलेल्या मजुर आहेत. काही कामे पंचायत समिती, कृषी विभाग तसेच रेशीम विभागामार्फत केली जात आहेत. - हेमंत ढोकले, तहसीलदार, कळंब
हे ही वाचा सविस्तर : MGNREGA Wages: 'रोहयो'च्या मजुरीत यंदा तरी होणार का वाढ? वाचा सविस्तर