यशवंत परांडकर
नांदेड :शेतीतील वाढती अनिश्चितता, हवामानाचा लहरीपणा आणि पारंपारिक पिकांमधील घटते उत्पन्न यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आता पर्यायी शेतीकडे वळताना दिसत आहेत.(Reshim Sheti)
विशेषतः रेशीम शेती (तुती लागवड) हा पर्याय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असून, कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या या व्यवसायाने जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली आहे.(Reshim Sheti)
सध्या जिल्ह्यात ४१० शेतकरी तब्बल ४३४ एकर क्षेत्रावर रेशीम शेती करत आहेत. यंदा नवीन क्षेत्रात वाढ झाली नसली तरी अस्तित्वात असलेल्या क्षेत्रातून दर्जेदार उत्पादन घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. प्रशासनाकडून आतापर्यंत सुमारे २ लाख आंडीपुंजांचे (silkworm egg batches) वाटप करण्यात आले आहे.
अनुदानामुळे वाढतोय आकर्षण
रेशीम शेतीला चालना देण्यासाठी शासन विविध योजनांद्वारे आर्थिक मदत देत आहे. मनरेगा योजनेंतर्गत १ एकर रेशीम शेतीसाठी तब्बल ४ लाख ३२ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. या अनुदानात तुतीची रोपे, कीटक संगोपन गृह (rearing house) आणि आवश्यक साहित्याचा समावेश असतो.
तसेच ‘सिल्क समग्र’ योजनेंतर्गतही शेतकऱ्यांना सुमारे ३ लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीही हा व्यवसाय सुलभ झाला आहे.
कमी खर्च, जास्त नफा
रेशीम शेतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अत्यल्प खर्चात मिळणारा जास्त नफा. एका सायकलसाठी साधारण ४ ते ५ हजार रुपये खर्च येतो. सध्या बाजारात रेशीम कोषाला ७०० ते ८०० रुपये प्रति किलो दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. पारंपारिक पिकांच्या तुलनेत हा व्यवसाय ४ ते ५ पट अधिक उत्पन्न देत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
अर्ज कसा कराल?
रेशीम शेती सुरू करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जासाठी आधार कार्ड, सातबारा उतारा, बँक पासबुक, पासपोर्ट फोटो आणि ५०० रुपये सभासद शुल्क आवश्यक आहे.
अधिकाऱ्यांचे आवाहन
शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रेशीम शेतीचा स्वीकार करावा आणि शासनाच्या अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, वाढत्या उत्पन्नाच्या शक्यतेमुळे रेशीम शेती हा पर्याय जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ‘गेमचेंजर’ ठरत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
अधिक वाचा : Wood Fuel Price Hike : गॅस टंचाईच्या भीतीने लाकूड बाजारात तेजी; दरात मोठी उसळी!
Web Summary : Nanded farmers are turning to sericulture (mulberry cultivation) due to uncertain traditional farming yields. Subsidies up to ₹4.32 lakh are available. Low investment, high profits; farmers earn ₹700-800/kg. Apply online.
Web Summary : नांदेड़ के किसान पारंपरिक खेती की अनिश्चितता के कारण रेशम उत्पादन (शहतूत की खेती) की ओर रुख कर रहे हैं। ₹4.32 लाख तक की सब्सिडी उपलब्ध है। कम निवेश, उच्च लाभ; किसानों को ₹700-800/kg मिलते हैं। ऑनलाइन आवेदन करें।