नाशिक : शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रेशीम उद्योग उत्तम पर्याय ठरत आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत पेठ तालुक्यात रेशीम उद्योगाला चालना मिळाली आहे. तालुक्यात जवळपास १२० शेतकऱ्यांनी यशस्वीरीत्या तुती लागवड करून रेशीम उद्योगात भरारी घेतली आहे.
पेठ तालुक्यात भात, नागली ही पारंपरिक पिके घेतली जात असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी जोडव्यवसाय करू लागला आहे. आतापर्यंत रेशीम उद्योगातून २२ शेतकऱ्यांना जवळपास २ लाखावर उत्पन्न सुरू झाले आहे. पंचायत समिती कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली १२० एकर तुती लागवड करण्यात आली असून यातून तयार होणाऱ्या रेशीम कोषला ४०० ते ६५० रुपये प्रतीकिलो भाव मिळत आहे.
एकदाच केलेला खर्च साधारण १५ ते २० वर्षापर्यंत उत्पादनाचे साधन बनत आहे. प्रती लाभार्थी कुशल व अकुशल अशा दोन भागात ४ लाख ३२ हजार अनुदान देण्यात येते. निसर्गाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांना हमखास उत्पन्नाचे साधन म्हणून रेशीम उद्योगाकडे पाहिले जाते.
पेठ तालुका : दृष्टिक्षेपात रेशीम उद्योग
- १) एकूण शेतकरी - १२०
- २) तुती लागवड क्षेत्र - १२० एकर
- ३) शासकीय अनुदान - ४ लाख ३२०००
- ४) मिळणारा भाव - ४०० ते ६५० रुपये प्रति. किलो
- ५) सुरू असलेली कामे - ७३७
- ६) आतापर्यंत मिळालेले उत्पन्न -१७ लाख ३६ हजार ७०१
शेती व्यवसाय करतांना केवळ एका एकरमध्ये तुती लागवड करून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादनाची हमी देणारा रेशीम उद्योग आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देत आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेतकरी रेशीम उद्योग करत असल्याने उत्पादन वाढीसाठी मदत होत आहे.
- संतोष राठोड, कृषी अधिकारी, पंचायत समिती. पेठ
भात व नागली शेतीतून अत्यल्प उत्पन्न मिळत असल्याने रेशीम उद्योग सुरू केला. केवळ खरीप हंगामावर अवलंबून न राहता शेतीला जोड व्यवसाय व शासनाचे अनुदान यामुळे कुटुंबाचे आर्थिक गणित जुळून आले आहे.कुटुंबाला आर्थिक हातभार लागला. आतापर्यंत जवळपास अडीच लाख उत्पन्न मिळाले आहे.
- हिरामण मोरे, शेतकरी, करंजखेड.
