गोंदिया : गरिबांचे पोट भरता यावे यासाठी शासनाकडून रेशन वाटप (Ration Vatap) केले जात आहे. मात्र, याचा लाभ सधन व बोगस व्यक्तींकडूनही घेतला जात असल्याचे शासनाच्या नजरेत आले आहे. अशात अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून 'मिशन सुधार वर्क' ही मोहीम राबविली जात आहे. याअंतर्गत बोगस रेशनकार्ड थेट रद्द केले जाणार आहेत.
एकही व्यक्ती उपाशी पोटी झोपू नये यासाठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून अन्न व धान्य पुरविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यातूनच रेशन वाटप केले जात असून याचा देशातील कोट्यवधी कुटुंबांना आधार होत आहे. मात्र, असे असताना कित्येक सधन व्यक्ती व बोगस रेशनकार्ड धारक गरिबांच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारताना दिसत आहे.
अशा बोगस लाभार्थीना दणका देण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून "मिशन सुधार वर्क' ही मोहीम राबविली जात आहे. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ७० रेशन कार्डची पडताळणी करण्यात आली आहे. त्यानुसार, जिल्ह्यातही ही मोहीम राबविली जात असून याअंतर्गत जिल्ह्यात १३ हजार ६६५ रेशनकार्डची छाननी करावयाची आहे.
स्थलांतरित व मृतांच्या नावेही धान्याची उचलजिल्ह्यातील अनेक लाभार्थी अन्यत्र स्थलांतरित झाले आहेत, तसेच काही कार्डधारक मयत झाले असतानाही त्यांच्या नावाने धान्याची उचल सुरू असल्याचे शासनाच्या नजरेत आले आहेत. यामधून बोगस, डुप्लिकेट, तसेच मृत व्यक्तींच्या नावे असलेले रेशन कार्ड रद्दबातल ठरविण्याचा हेतू प्रशासनाने स्पष्ट केला आहे.
शासन सूचनेनुसार रेशन कार्डधारकांची पडताळणी केली जात आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ही पडताळणी करावयाची असून त्यानुसार जिल्ह्यात काम सुरू आहे.- सतीश अगडे, जिल्हा पुरवठा अधिकारी