Pathari Ranbhaji : पाथरी ही रोपवर्गीय वनस्पती महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. ही वनस्पती भारतातील सर्व पठारी प्रदेशात सावलीत, रेताड जमिनीत उगवते. पाथरी सुमारे ६० ते १७० सें.मी. उंच वाढते. या रानभाजीचे (Ranbhaji) फायदे काय आहेत, ती कशी बनवायची, हे आपण पाहुयात...
पाथरीच्या भाजीचे फायदे
- पाथरीचा अंगरस जेष्ठमधाबरोबर बाळंतिणीचे दूध वाढण्यासाठी उपयूक्त आहे.
- चारा म्हणून वापरल्यास जनावरांचे दूध वाढते.
- पाथरीचे चाटण सुक्या खोकल्यास उपयुक्त आहे.
- भाजीने पित्ताचा त्रास कमी होतो.
- कावीळ व यकृत विकारात ही भाजी उपयुक्त आहे.
पाथरीची पातळ भाजी कशी बनवायची? साहित्य - पाथरीची चिरलेली भाजी, ताक, मीठ, हिरवी मिरची, लाल मिरची, साखर, चणाडाळ, शेंगदाणे, बेसन, तेल, मेथी, मोहरी, हिंग, हळद, जिरे इ.
भाजी कशी बनवायची?
- पाथरीची चिरलेली भाजी उकडून घ्यावी व पाणी टाकून द्यावे.
- डाळ, दाणे भिजवून तासाभराने दाणे, डाळ वेगवेगळे शिजवावे.
- पाथरीची भाजी शिजवून घोटून घ्यावी. तेव्हाच मीठ, साखर, बेसन व ताक घालून एकजीव करावे.
- डाळ, दाणे घालावे.
- फोडणीत दोन्ही मिरच्या व इतर साहित्य घालून त्यात एकजीव केलेली भाजी ओतावी व ढवळत राहून उकळावे.
- ताकाऐवजी चिंचेचा कोळ, गूळ घालूनही भाजी करता येते.
पाथरीची सुक्की भाजी कशी बनवायची? साहित्य : १ जुडी भाजी, १ चमचा मूगडाळ, १ चमचा कच्चे शेंगदाणे, १.५ चमचा तेल, २-३ हिरव्या मिरच्या, ७-८ लसूण पाकळ्या, पाव चमचा जीरे, चवीप्रमाणे मीठ कशी बनवायची भाजी
- भाजी व्यवस्थित निवडून घेऊन खराब पाने काढून टाकावी.
- पाण्याने दोन-तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यावी.
- मुगाची डाळ धुवून भिजत घालावी.
- भाजी सुरीने चिरून घ्यावी कच्चे शेंगदाणे जाडसर कुटून घ्यावे.
- हिरवी मिरची व लसूण खलबत्त्यात कुटून घ्यावे.
- गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तेल घालून घ्यावे.
- तेल तापले की त्यात जीरे घालावे.
- मग हिरवी मिरचीचे वाटण घालून परतून घ्यावं. त्यात चिरलेली भाजी घालून परतून घ्यावं.
- भिजवलेली मुगडाळ घालून चवीनुसार मीठ घालावं आणि झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवून घ्यावे.
- शेंगदाणे कूट घालून मिक्स करून २-३ मिनिटे ठेवावे आणि गॅस बंद करावा.
- भाकरी सोबत ही भाजी खायला अप्रतिम लागते.
ही भाजी कशी ओळखावी?
- या वनस्पतीला जमिनीलगत अनेक पानांचे गोलाकार गुच्छ येतात.
- पानांची लांबी १० ते ३० सें.मी. तर रुंदी १५ ते २० सें.मी. असते. मुळे व पाने थोडथोड्या अंतरावर असतात.
- पाने लांबट आकाराची असून, त्यांची कडा जरा नागमोडी कापल्या सारखी असतात. पाने देठरहित असून, थोडीशी जाडसर असतात. पाथरीचे मूळ हे मांसल १५ ते २० सें.मी. लांब, थोडेसे जाड असते. मूळ ताजे असताना हे पिवळट-पांढरे असते.
- पसरट पानांच्या मध्यातून लहान, नाजूक खोड तयार होते. पाथरीच्या पानांत व खोडात पांढरा दुधासारखे द्रव्य असते.
- खोडाच्या शेंड्याजवळ फुलांचे गोंडे तयार होतात. ते १२ ते १४ मि.मी. लांब असतात.
- फुले पिवळसर रंगाची असतात पाथरीला नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात फुले येतात.
- फुले येण्याच्या आधीच ही भाजी खाण्यासाठी चविष्ट लागते.
- श्रीमती सोनाली कदम, सहाय्यक कृषि अधिकारी, आडगाव चोथवा, ता- येवला, जिल्हा- नाशिक