Join us

Bharangi Ranbhaji : पोटाच्या विकारावर उपयुक्त असलेली भारंगी रानभाजी, अशी आहे रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 20:06 IST

Bharangi Ranbhaji : भारंगी ही झुडूपवर्गीय रानभाजी डोंगरउतारावर, खुरट्या जंगलात, नदीनाल्यांच्या काठावर सहज आढळते.

Bharangi Ranbhaji : भारंगी ही झुडूपवर्गीय वनस्पती डोंगरउतारावर, खुरट्या जंगलात, नदीनाल्यांच्या काठावर आणि शेताच्या सीमारेषांवर सहज आढळते. मुख्यतः कोकणात मोठ्या प्रमाणावर आढळते. फांद्या चौकोनी, पाने लंबट व कातरलेल्या कडा असलेली.

पावसाळ्याच्या अखेरीस (भाद्रपद महिन्यात) निळसर-पांढऱ्या फुलांचे सुंदर पुंजके फांदीच्या (Ranbhaji) टोकावर उमलतात. फळे गोलसर, काळसर जांभळी व चमकदार असतात. दिवाळीनंतर पाने गळून पडतात, पण काडक्या पावसाळ्यापर्यंत जिवंत राहतात आणि नवीन पावसाळ्यात पुन्हा हिरवीगार होतात.

भारंगी रानभाजीचे औषधी गुणधर्म

  • दमा, सर्दी, कफ यावर भारंगीचे मूळ उपयोगी.
  • पोट साफ होण्यासाठी आणि जंतनाशक म्हणून पाने उकळून दिली जातात.
  • भाजी पाचक असल्यामुळे पोट हलके होते व चव वाढते.
  • पोट जडपणा, ताप, खोकला यावरही भाजी गुणकारी.

 

1) भारंगीच्या पानांची भाजी -

साहित्य : 

  • भारंगीची कोवळी पाने – 2 वाट्या (देठ काढून टाकावेत)
  • कांदा – दीड वाटी (चिरून)
  • लसूण – 5-6 पाकळ्या (ठेचून)
  • सोबत तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, गूळ, मीठ. 

कृती : 

  • 2 कप पाणी उकळवून चिरलेली पाने वाफवून घ्या. पाणी काढून टाका (कडवटपणा कमी होतो).
  • कढईत तेल गरम करून मोहरी, हिंग, हळद, लसूण आणि कांदा परतून घ्या.
  • त्यात वाफवलेली पाने घालून झाकण ठेवून एक वाफ काढा.
  • थोडा गूळ, मीठ घालून चांगले परतवा.

 

2) भारंगीच्या फुलांची भाजी - 

साहित्य : 

  • भारंगीची फुले – 2 वाट्या
  • मूगडाळ – दीड वाटी
  • कांदा – 1 वाटी (चिरलेला)
  • सोबत तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, गूळ, मीठ

कृती : 

  • फुले चिरून 2-3 वेळा पाण्यात धुवून पिळून घ्या (कडवटपणा कमी होतो).
  • तेलाची फोडणी करून कांदा परतावा. मूगडाळ घालून परतावे.
  • फुले घालून मंद गॅसवर परतत ठेवावे.
  • तिखट, मीठ, गूळ घालून शिजवावे. भाजी शिजल्यावर ती घट्ट होते.

टीप : पावसाळ्यात गावाकडे रस्त्यांच्या कडेला आदिवासी शेतकरी या पौष्टिक रानभाज्या विक्रीसाठी बसलेले असतात. या भाज्या आवर्जून घ्या व आपल्या आहारात समाविष्ट करा.

- श्रीमती सोनाली कदम, सहाय्यक कृषि अधिकारी, आडगाव चोथवा, ता. येवला, जिल्हा- नाशिक

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीपाऊसपाककृतीअन्न