मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने (Avkali Paus) शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. अनेक जिल्ह्यात शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसा दरम्यान एका शेतकऱ्याचा शेतमाल वाहून जात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या बिकट परिस्थितीचा विडिओ केंद्रीय कृषिमंत्र्यांनी (Shivraj Singh Chauhan) पाहत शेतकऱ्याला फोन करून विचारपूस केली आहे.
राज्यात आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) सुरु आहे. १५ मे २०२५ रोजी वाशीम जिल्ह्यातील (Washim District) बोरव्हा येथील शेतकरी गौरव पवार याने २५ क्विंटल भुईमुगाची शेंग मानोराच्या बाजारात आणली होती. ट्रॅक्टर रिकामे करून तो नंबरची वाट पाहत होता. २५वा नंबर असल्याने दोन तास उलटले तरी आधीची हर्रासी संपली नव्हती. त्याच दरम्यान मुसळधार पाऊस सुरू झाला. एवढा की रस्त्यावर जोरदार पाणी वाहू लागले.
या दरम्यान गौरवाने उभ्या केलेल्या ढिगाऱ्यावर पाणी शिरलं. बघता बघता शेंगा पाण्यासोबत वाहू लागल्या. यावेळी गौरवने भुईमुगाच्या शेंगा रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र तो हतबल झाल्याचे या व्हिडिओतून दिसते आहे. यानंतर हा व्हिडिओ राज्यभरात व्हायरल झाला. हे हृदयद्रावक दृश्य केंद्रीय मंत्र्यांच्याही निदर्शनास आले, त्यांनी शेतकऱ्याला फोन करून याबाबत विचारपूस केली.
शेतकऱ्याला मदतीचे आश्वासन “व्हिडिओ पाहून मला खूप वाईट वाटले. पण काळजी करू नका. महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल खूप संवेदनशील आहे. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे कृषी मंत्र्यांशी बोललो आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांशीही बोललो आहे. जे काही नुकसान झाले असेल ते भरून काढले जाईल, जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कोणताही त्रास होणार नाही,” असे चौहान व्हिडिओमध्ये म्हणताना ऐकू येत आहे.