Join us
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीत कडधान्यांचा बोलबाला; शेतकऱ्यांचा नव्या ट्रेंडकडे कल वाढला, सविस्तर वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 16:26 IST

खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामात मात्र आशादायी चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील धरणे व जलसाठे भरल्यामुळे रब्बी हंगामासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले असून याचा थेट परिणाम पेरणीवर झाला आहे.

खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.अपेक्षित उत्पादन हाती न लागल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले.

मात्र, याच संकटातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात अधिक पेरणी करण्याचा निर्णय घेतला. परिणामी जिल्ह्यात रब्बी पेरणीचे क्षेत्र सरासरीपेक्षा चार टक्क्यांनी वाढले आहे.

१०४ टक्के रब्बी पेरणी

धाराशिव जिल्ह्याचे रब्बी हंगामासाठी सरासरी क्षेत्र ४ लाख १७ हजार २०१ हेक्टर इतके आहे. प्रत्यक्षात १५ जानेवारीपर्यंत ४ लाख ३४ हजार ३९८ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली असून ही पेरणी सरासरीच्या तुलनेत चार टक्के अधिक आहे. ज्वारी, गहू, हरभरा, वाटाणा, चवळी व राजमा या पिकांना शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. सध्या शेतात डोलणारी हिरवीगार पिके आणि अनुकूल हवामानामुळे यंदा दमदार उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कडधान्यांचा पेरा वाढला

रब्बी हंगामात कडधान्यांच्या पेरणीत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः हरभऱ्याच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून जिल्ह्यातील संरक्षित २ लाख ८ हजार ५७३ हेक्टर क्षेत्रापैकी २ लाख ९ हजार ५६६ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी पूर्ण झाली आहे. याशिवाय वाटाणा, चवळी आणि राजमा यांसारख्या कडधान्यांनाही चांगली पसंती मिळाली आहे. कमी कालावधीत येणारी आणि तुलनेने कमी खर्चाची ही पिके शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरत आहेत.

तेलबियांकडे शेतकऱ्यांची पाठ

अन्नधान्य व कडधान्यांच्या तुलनेत तेलबियांच्या पेरणीत मात्र मोठी घट दिसून येत आहे. जिल्ह्याचे तेलबियांचे सरासरी क्षेत्र ६ हजार ८९९ हेक्टर असताना प्रत्यक्षात केवळ ४ हजार ४७२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. करडई, जवस आणि सूर्यफूल या पिकांचा यामध्ये समावेश आहे. सध्या बाजारात तेलबियांना चांगला भाव मिळत असतानाही शेतकऱ्यांनी या पिकांकडे फारसा कल दाखवलेला नाही, ही बाब कृषी विभागासाठी चिंतेची ठरत आहे.

प्रमुख पिकांची स्थिती

ज्वारी : जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र १,६२,५०९ हेक्टर असून प्रत्यक्ष १,५९,१३७ हेक्टरवर म्हणजेच ९८ टक्के पेरणी झाली आहे.

गहू : संरक्षित क्षेत्राच्या तुलनेत गव्हाची पेरणी १०० टक्के पूर्ण झाली आहे.

हरभरा : कडधान्यांमध्ये सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा असून सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला

बाजारात सध्या गळीत धान्यांना चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तृणधान्य व कडधान्यांप्रमाणेच तेलबियांनाही प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी व्यक्त केले आहे.

कमी उत्पादन खर्च आणि चांगला बाजारभाव लक्षात घेता पुढील हंगामात तेलबियांची पेरणी वाढविणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामात पेरणीने विक्रमी टप्पा गाठला असून, यंदा निसर्गाची साथ लाभल्यास शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा सविस्तर : Mango Farming : खडकाळ शेतजमिनीत फुलली आंब्याची बाग वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Pulses surge in Rabi season; Farmers embrace new trend.

Web Summary : Farmers in Dharashiv increased Rabi sowing after Kharif losses, especially pulses like chickpeas. While pulse sowing increased, oilseed sowing decreased, concerning agricultural officials, who advise farmers to consider oilseeds for better returns.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीकरब्बी