Join us

POCRA Scam : पोकरा योजना चौकशी: अहवाल न दिल्यामुळे १५ अधिकाऱ्यांना नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 14:57 IST

POCRA Scam : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजनेत गैरव्यवहार उघडकीस येताच प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. जालना जिल्ह्यातील १५ कृषी अधिकाऱ्यांना चौकशी अहवाल सादर न केल्यामुळे 'कारणे दाखवा' नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. कोट्यवधींच्या निधीच्या वापरात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप असून, आता शासनाच्या स्पष्ट निर्देशानंतर चौकशी अधिक तीव्र झाली आहे. (POCRA Scam)

POCRA Scam : 'नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना' (पोकरा) अंतर्गत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी आता कारवाईची गती वाढली आहे. जालना जिल्ह्यातील योजनेच्या चौकशीसंदर्भात १५ अधिकाऱ्यांना विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने 'कारणे दाखवा' नोटिसा बजावल्या आहेत.(POCRA Scam)

चौकशी अहवाल सादर न केल्यामुळे नोटिसा

वारंवार सूचना देऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल सादर केला नाही. त्यामुळे विभागीय कृषी सहसंचालकांनी अधिकाऱ्यांना थेट नोटिसा बजावल्या आहेत. संबंधितांना आता ठोस कारणे आणि चौकशीसंदर्भातील दस्तऐवजांसह हजर राहण्याची सक्ती करण्यात आली आहे.

पोकरा योजनेत शेतकऱ्यांना गंडा?

पोकरा योजनेची अंमलबजावणी करताना काही कृषी अधिकारी, पुरवठादार व शेतकऱ्यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.

या अनियमिततेमुळे योजनेंतर्गत होणाऱ्या कामांमध्ये भ्रष्टाचार व अपहार झाल्याचा संशय असून, त्यामुळे अनेक लाभार्थी शेतकरी वंचित राहिल्याची बाब समोर आली आहे.

परतूरचे कृषी अधिकारीही चौकशीच्या रडारवर

परतूर येथील उपविभागीय कृषी अधिकारी रोडगे यांनी चौकशी पथकाला आवश्यक दस्तऐवज वेळेत उपलब्ध करून न दिल्यामुळे त्यांनाही कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.

तत्कालीन अधिकारी शीतल चव्हाण यांच्यावरही कारवाई

पूर्वीच या प्रकरणात तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण यांच्यासह इतर ३ अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला होता.

शासनाने अपहारीत रकमेच्या वसुलीचे आदेश दिले होते.

मात्र, चव्हाण यांना नंतर सोलापूरमध्ये अधीक्षकपदाची पदोन्नती मिळाली होती.

'लोकमत'ने हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्यांचे निलंबन झाले.

सरकारने दिले चौकशीचे निर्देश

या सर्व पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडून जबाब मागवले जात असून, दोषी आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : POCRA Scam : तपासणी झाली, आकडे उघडे पडले; 'पोखरा' घोटाळ्याचा भांडाफोड वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतकरीशेती