- सुनील चरपेनागपूर : ‘व्हायरस’मुळे कापसाचे उत्पादन (Cotton farming) कमी हाेत असून, शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी व्हायरसचा प्रतिकार करणारे कापसाचे बियाणे उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी (दि. ११) काेयम्बतूर येथे बैठक आयाेजित केल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी दिली. व्हायरसऐवजी गुलाबी बाेंडअळी कापसाचे अधिक नुकसान करते. कापसाचे संकरित वाण कालबाह्य झाल्याने त्याला पर्याय म्हणून सरळवाणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे.
शिवराजसिंह चव्हाण यांची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली. यात त्यांनी कापसाचे उत्पादन व गुणवत्ता वाढविण्यासाठी हवामान अनुकूल व व्हायरसचा प्रतिकार करणारे चांगल्या प्रतीचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासंदर्भात वक्तव्य केले आहे. कापसावर कॉटन लीफ कर्ल व टोबॅको स्ट्रीक या दाेन व्हायरसचा प्रादुर्भाव हाेत असून, त्याचे प्रमाण आणि नुकसान तीव्रता गुलाबी बाेंडअळीच्या तुलनेत खूपच कमी आहे.
ही बैठक कापसाच्या एचटीबीटी वाणाला अधिकृत परवानगी देण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी बाेलावली आहे. एचटीबीटी वाण तणनाशक सहनशील आहे. या वाणाचा व व्हायरस अथवा किडींचा कुठलाही संबंध नाही. शिवराजसिंह चव्हाण यांनी दिलेल्या टाेल फ्री क्रमांकावर संपर्क केला असता, हा क्रमांक शेतकऱ्यांना शेतीविषयक सल्ला देण्यासाठी आहे. शेतकऱ्यांच्या सूचना सरकारपर्यंत पाेहाेचविण्याचा आपल्याला अधिकार नाही, असेही संबंधित व्यक्तीने स्पष्ट केले.
उत्पादन वाढीसाठी भांडवली खर्च व अनुकूल हवामान आवश्यकबियाण्यांमुळे काेणत्याही पिकांचे फारसे उत्पादन वाढत नाही. त्यासाठी खते, कीटकनाशकांसाेबत इतर भांडवली खर्च वाढवावा लागताे. हवामान अनुकूल असल्यास उत्पादन व गुणवत्तेत वाढ हाेते. उत्पादन वाढले की सरकार त्याचा वापर भाव पाडण्यासाठी करते. उत्पादन वाढीसाेबत खर्च व धाेका वाढताे. भाव पाडल्याने शेतकऱ्यांवरील कर्ज वाढत जाते. समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी पर्यायी पिके घेतात. हाच प्रकार कापसासाेबत घडत आहे.
कापसाचे जे बियाणे उपलब्ध करून द्यायचे आहे, ते द्यावे; पण सरळवाणात द्यावे. त्यासाठी सरकारने चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये किंवा संकरित वाणाचा आग्रह धरू नये. आमची मागणी चूक असेल तर ती चूक कशी आहे, हेदेखील सरकारने आम्हाला व शेतकऱ्यांना समजावून सांगावे.- विजय जावंधिया, कृषितज्ज्ञ