Join us

Pik Vima Yojana : नुसता कांद्यांचाच नाही तर फळपीकविम्यातही गोंधळ, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 14:43 IST

Pik Vima Yojana : पीकविम्यातील गोंधळ केवळ कांदा पिकावरच (Pik Vima Yojana) नाही, तर फळपिकावर देखील झाल्याचे समोर आले आहे.

- संदीप भालेराव 

नाशिक : पीकविम्यातील (Pik Vima Yojana) गोंधळ केवळ कांदा पिकावरच (Kanda Crop) नाही, तर फळपिकावर देखील झाल्याचे समोर आले आहे. कृषी आयुक्तालयाच्या आदेशानुसार केलेल्या पडताळणीत नाशिक जिल्ह्यातील मृग बहारातील (Nashik District) फळ पिकांचा विमा काढताना अनियमितता झाल्याचे समोर आले आहे. योग्य वेळी विमाक्षेत्राची पडताळणी झाली नसती तर शासनाला ८.७२ लाखांचा फटका बसला असता. या पडताळणीमुळे शासनाची मोठी रक्कम बचत होण्यास मदत झाली आहे.

फळपीक विमा योजनेंतर्गत (Fal Pik Vima) नाशिक जिल्ह्यासाठी बजाज आलियांस या कंपनीत प्राधिकृत केले आहे; परंतु पीक विमा नोंदविताना गैरप्रकार झाल्याची बाब समोर आली. गेल्या डिसेंबर महिन्यात मृग बहार अंतर्गत डाळिंब, द्राक्ष, सीताफळ, लिंबू या फळपिकामध्ये पीक विमा उतरवलेल्या क्षेत्रामध्ये पडताळणी करण्याची सूचना आयुक्तालयाने दिली होती.

त्यावेळी या पिकांच्या विमाक्षेत्रात तफावत असल्याचे समोर आले. मृग बहारात १९७८ शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेऊन १४६१.५० हेक्टर क्षेत्रावर फळपीक विमा उतरविला आहे. यामध्ये ५०५ शेतकऱ्यांच्या १९९.५४ हेक्टर क्षेत्रावर तफावत आढळून आली.

क्षेत्रापेक्षा अधिक विमाया अनियमित क्षेत्राची योग्य वेळी तपासणी झाली नसती तर शासनाला विम्यापोटी ८ लाख ७१ हजार ९०० रुपये विमा कंपनीला भरावे लागले असते. विशेषताः डाळिंब पिकामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळली असून ४९३ शेतकऱ्यांच्या १९५.८० हेक्टर क्षेत्रावर तफावत आढळून आली. प्रत्यक्ष लागवड क्षेत्रापेक्षा अधिक विमा उतरविण्यात आल्याने शासनाला मोठा फटका बसला असता.

एक रुपया शेतकऱ्याचा, इतर शासनाचेपिक विमा रकमेत शेतकऱ्याचा हिस्सा केवळ एक रुपया इतका असतो. उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारला मिळून भरावी लागते. नाशिक जिल्ह्यात कांदा आणि फळपिकात तफावत आढळल्याने कांदा पिकासाठी ३८८ तर फळपीकविमा योजनेसाठी ८.७२ लाख इतका विमानिधी सरकारला भरावा लागला असता; परंतु पडताळणीमुळे शासनाची मोठी रक्कम यामुळे वाचली आहे.

एनए झालेल्या प्लॉटवरही विमा ?क्षेत्रीय कार्यालयाकडून केलेल्या पडताळणीत गैरप्रकारचे किस्से समोर आले आहेत. काही ठिकाणी एन.ए. प्लॉटवर देखील पीक दाखवून त्यावर विमा काढला आहे, तर एकाच क्षेत्रावर दोन शेतकऱ्यांनी विम्याची नोंद केल्याचा प्रकारही या पडताळणीत उघडकीस आला. शासनाची मोठी फसवणूक या माध्यमातून होऊ शकली असती ती मात्र वेळीच वाचली.

टॅग्स :पीक विमाशेती क्षेत्रशेतीकृषी योजना