Pik Spardha : प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन पीक उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या पीक स्पर्धेकडे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले आहे. (Pik Spardha)
खरिप हंगाम २०२५ मध्ये जिल्ह्यातील केवळ ७७ शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला असून, काही पिकांसाठी तर एकाही शेतकऱ्याने अर्ज केला नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे रबी हंगामातही अशीच उदासीनता कायम असल्याचे दिसून येत आहे.(Pik Spardha)
शेतकऱ्यांकडून पिकांच्या उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी नवनवीन प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सुधारित पद्धती अवलंबिल्या जातात. (Pik Spardha)
अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना शासनामार्फत गौरव व आर्थिक प्रोत्साहन मिळावे, या हेतूने कृषी विभागाकडून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पीक स्पर्धा योजना राबविण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.(Pik Spardha)
रब्बी हंगामातील पिकांकडेही दुर्लक्ष
जिल्ह्यात खरिपासोबतच रब्बी हंगामातील पिकांसाठी घेण्यात येणाऱ्या पीक स्पर्धेकडेही शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. तालुकास्तरावरून अद्याप जिल्हा कृषी कार्यालयाकडे अर्ज सादर न झाल्याने रबी हंगामात नेमका किती सहभाग आहे, हेही स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे ही योजना केवळ कागदावरच मर्यादित राहते की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खरिपात केवळ ७७ प्रस्ताव
खरिप २०२५ मध्ये जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीन आणि तूर या पिकांसाठी मिळून एकूण केवळ ७७ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. यातही कळमनुरी तालुका वगळता इतर कोणत्याही तालुक्यातून मूग व उडीद पिकांसाठी एकही प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. तूर पिकासाठी तर हिंगोली तालुक्यातून फक्त एकाच शेतकऱ्याने अर्ज केला असून, उर्वरित तालुक्यांतून एकाही शेतकऱ्याचा सहभाग नाही.
तालुकानिहाय सहभाग अत्यल्प
तालुकानिहाय पाहता हिंगोली तालुक्यातून सोयाबीनसाठी २५, तूरसाठी ४ प्रस्ताव आले आहेत. कळमनुरी तालुक्यात मूगसाठी ५, उडीदसाठी २ आणि तूरसाठी ४ प्रस्ताव मिळाले आहेत. वसमत, सेनगाव आणि औंढा नागनाथ या तालुक्यांत काही पिकांसाठी एकही अर्ज सादर करण्यात आलेला नाही, तर काही ठिकाणी मोजकाच सहभाग दिसून आला आहे.
बक्षिसांची आकर्षक रचना असूनही प्रतिसाद कमी
पीक स्पर्धेत तालुका पातळीवर प्रथम बक्षीस ५ हजार, द्वितीय ३ हजार आणि तृतीय २ हजार रुपये दिले जाते. जिल्हा पातळीवर प्रथम १० हजार, द्वितीय ७ हजार आणि तृतीय ५ हजार रुपये बक्षीस आहे. तर राज्य पातळीवर प्रथम बक्षीस तब्बल ५० हजार रुपये आहे. एवढी आकर्षक बक्षीस रचना असूनही शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी राहणे ही बाब चिंताजनक मानली जात आहे.
प्रयोगशील शेतकरी कसे घडणार?
तालुकास्तरावरील स्पर्धेत सहभागी शेतकऱ्यांची उत्पादकता आधारभूत धरून जिल्हा व राज्य पातळीवरील विजेत्यांची निवड केली जाते. मात्र, जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत एकाही शेतकऱ्याने सहभाग नोंदविला नसल्याने प्रयोगशील शेतकरी कसे घडणार, असा सवाल उपस्थित होत आहे. योजनेची माहिती पोहोचत नाही की प्रक्रिया किचकट आहे, याचा कृषी विभागाने गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे.
Web Summary : Hingoli farmers show little interest in crop competitions aimed at boosting productivity. Poor participation in both Kharif and Rabi seasons raises concerns about the scheme's effectiveness despite attractive prizes. Urgent review needed.
Web Summary : उत्पादकता बढ़ाने के उद्देश्य से फसल प्रतियोगिताओं में हिंगोली के किसानों की कम रुचि है। खरीफ और रबी दोनों मौसमों में कम भागीदारी से आकर्षक पुरस्कारों के बावजूद योजना की प्रभावशीलता पर चिंता है। तत्काल समीक्षा आवश्यक है।