Join us
Daily Top 2Weekly Top 5

Pik Karja : खरीप तोंडावरच शेतकऱ्यांना मोठा झटका! ना कर्जमाफी, ना पीककर्ज… आता काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 09:11 IST

Pik Karja : खरीप हंगामाच्या अगदी तोंडावर शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. जिल्ह्यातील लाखो शेतकरी थकबाकीमुळे नवीन पीक कर्जापासून वंचित राहिले असून कर्जमाफीही अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे 'ना कर्जमाफी, ना पीककर्ज' अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. (Pik Karja)

अमरावती : जिल्ह्यात खरीप हंगामाची चाहूल लागली असताना पीक कर्जवाटपाची प्रक्रिया ठप्प झाल्याचे चित्र आहे.(Pik Karja)

जिल्ह्यातील सुमारे दीड लाख शेतकऱ्यांवर तब्बल १५५० कोटी रुपयांची पीक कर्ज थकबाकी असल्याने नव्याने कर्ज मिळण्यात अडथळे निर्माण झाले आहेत.(Pik Karja)

कर्जाचे पुनर्गठण न झाल्याने 'ना कर्जमाफी, ना पीककर्ज' अशा कात्रीत शेतकरी सापडल्याची स्थिती निर्माण झाली आहे.(Pik Karja)

खरीप हंगामासाठी शेतकरी मशागतीच्या कामात गुंतले असताना आर्थिक पाठबळाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड झाली असली, तरी प्रत्यक्षात लाभ मिळालेला नाही. यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना नवीन कर्जासाठी पात्र ठरता येत नाही.

पुनर्गठणाकडे दुर्लक्ष; शेतकरी 'थकबाकीदार'

बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कर्ज पुनर्गठणाची सुविधा उपलब्ध असली तरी अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.

परिणामी, तांत्रिकदृष्ट्या हे शेतकरी 'डिफॉल्टर' ठरत असून, जुन्या कर्जाचा भरणा किंवा पुनर्गठण झाल्याशिवाय नवीन पीक कर्ज मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

थकबाकीचा डोंगर वाढतच

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आकडेवारीनुसार, ३० सप्टेंबर २०२५ अखेर ७१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची माहिती कर्जमाफीसाठी पोर्टलवर नोंदवण्यात आली आहे.

यामध्ये एकूण ७००.८० कोटी रुपयांची थकबाकी असून त्यात ४४३.२७ कोटी रुपये मुद्दल तर २५७.५३ कोटी रुपये व्याजाचा समावेश आहे. वाढत्या व्याजामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक बोजा अधिकच वाढत चालला आहे.

तीन वर्षांत दुपटीने वाढ

गेल्या तीन वर्षांत थकबाकीदारांची संख्या आणि थकबाकीची रक्कम दोन्ही झपाट्याने वाढली आहे. २०२२-२३ मध्ये ४,३०७ असलेली थकबाकीदारांची संख्या २०२४-२५ मध्ये ८,३९५ वर पोहोचली आहे. थकबाकीची रक्कमही ३७ कोटींवरून थेट ९८ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.

कर्जवाटपाचे टार्गेटच निश्चित नाही

दरवर्षी मार्चमध्ये राज्यस्तरीय बँकर्स समिती आणि जिल्हास्तरीय बैठकीत खरीप कर्जाचे उद्दिष्ट व दर निश्चित केले जातात.

मात्र, यंदा या बैठका न झाल्याने कर्जवाटप प्रक्रियेला सुरुवातच झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया थंड्या बस्त्यात गेली आहे.

कर्जमाफीची प्रक्रिया सुरू

'कर्जमाफीची प्रक्रिया सध्या शासन स्तरावर सुरू आहे. खरीप हंगामाचे टार्गेट अद्याप निश्चित व्हायचे आहे. जिल्हा बँकेने कर्जवाटप सुरू केले असून, गतवर्षीच्या कर्जवसुलीचा टक्का समाधानकारक आहे,' अशी माहिती जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी दिली.

शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट

एकीकडे वाढती थकबाकी आणि दुसरीकडे नव्या कर्जाचा अभाव, अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकले आहेत.

खरीप हंगामाच्या तोंडावरच आर्थिक कोंडी झाल्याने पेरणीपूर्व तयारीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शासनाने तातडीने कर्जमाफी किंवा पुनर्गठणाबाबत निर्णय घेऊन कर्जवाटप सुरू करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Karjmafi : कर्जमाफीच्या आशेवर वसुली थांबली? 'या' जिल्ह्यातील ७१ हजार शेतकरी डिफॉल्टर

अधिक वाचा : Electricity Bill Problems : वीजबिल अचानक वाढलं? स्मार्ट मीटर नव्हे; 'हे' आहे खरे कारण

English
हिंदी सारांश
Web Title : Crop Loan Crisis: Farmers Face Setback with Kharif Season Approaching

Web Summary : Amravati farmers face a loan crisis as Kharif season nears. Overdue loans hinder new credit, trapping farmers. Loan waivers are stalled, and restructuring neglected, leaving farmers in dire financial straits for pre-sowing preparations. Urgent government action is needed.
टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतकरीशेतीअमरावती