साहेबराव राठोड
यंदाच्या हंगामात परिसरातील पपई उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. हिवाळ्यात पपईची चांगली फळधारणा होऊन बाजारात विक्री करता येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी बाळगली होती. (Papaya Farmers Crisis)
मात्र,अनियमित पावसाळा आणि सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे पपई पिकाला जबर फटका बसला असून फळधारणा मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी अनेक पपई बागा तोट्यात जाण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. (Papaya Farmers Crisis)
शेलूबाजार परिसरात यंदा सुमारे २५ ते ३० शेतकऱ्यांनी पपईची लागवड केली होती. सुरुवातीच्या काळात पिकाची वाढ समाधानकारक दिसत होती. मात्र पावसाळ्यातील मुसळधार पावसामुळे झाडांची वाढ खुंटली, जमिनीत ओलावा साचला आणि रोगराईचा प्रादुर्भाव वाढला. याचा थेट परिणाम फुलधारणा व फळधारणेवर झाला असून अनेक झाडांनी अपेक्षित प्रमाणात फळे धरलेली नाहीत. (Papaya Farmers Crisis)
हिवाळा सुरू होऊनही पपईच्या झाडांवर अपेक्षेप्रमाणे फळे लागत नसल्याने उत्पादन खर्च वसूल होईल की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. बियाणे, खते, कीटकनाशके, औषधे, मजुरी आणि सिंचन यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना प्रत्यक्ष उत्पादन मात्र कमी झाले आहे. (Papaya Farmers Crisis)
यंदाच्या पावसाळ्याने पपईसह केळी आणि इतर फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. काही भागांत व्हायरल इन्फेक्शनचा प्रादुर्भाव वाढल्याने झाडांची उत्पादकता आणखी घटली आहे.
अनेक शेतांमध्ये पपईच्या झाडांना सुरुवातीला फुले आली होती; मात्र सततच्या अतिवृष्टीमुळे ही फुले गळून पडली. परिणामी सध्या अनेक शेतांमध्ये झाडे फळाविना उभी असल्याचे चित्र दिसत आहे.
विशेष म्हणजे, यावर्षी अनेक नवोदित शेतकऱ्यांनी पपई लागवडीकडे वळण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. मात्र अतिवृष्टी, रोगराई आणि फळधारणा घटल्यामुळे त्यांनाही मोठ्या निराशेला सामोरे जावे लागत आहे. शेतीवरील गुंतवणूक वाया जाण्याची भीती त्यांना सतावत आहे.
फळधारणा कमी असली तरी बाजारात चांगले दर मिळावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. मात्र सध्या पपईचे बाजारभावही अपेक्षेप्रमाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
स्थानिक बाजारपेठेत पपईचे दर सतत चढ-उतार होत असून ते उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी आहेत. काही शेतांमध्ये थोडीफार फळे आली असली तरी व्यापारी ती घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.
एकेकाळी या भागातील पपईला देश-विदेशात मोठी मागणी होती. मात्र सध्या स्थानिक व्यापारीसुद्धा किरकोळ विक्रीसाठी पपई घेण्यास टाळाटाळ करत आहेत. शासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची मदत, नुकसान भरपाई किंवा नुकसानीचे सर्वेक्षण न झाल्याने पपई उत्पादक शेतकऱ्यांची मोठी गोची झाली आहे.
सध्याची परिस्थिती पाहता पपई उत्पादक शेतकऱ्यांचा हा संपूर्ण हंगाम तोट्यात जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने नैसर्गिक आपत्ती अनुदानातून पपई उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, तसेच नुकसानग्रस्त बागांचे तात्काळ सर्वेक्षण करावे, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
अतिवृष्टीमुळे यंदा पपई उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. उत्पादन घटले असून बाजारभावही अत्यंत कमी आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यांनाच मोठा फटका बसत आहे.- डॉ. रामदास घनश्याम सुर्वे, शेतकरी, लाठी
Web Summary : Papaya farmers in the region are facing a severe crisis due to unseasonal rains and subsequent fruit drop. Many orchards are running at a loss. Farmers are demanding immediate government assistance and damage assessment.
Web Summary : क्षेत्र के पपीता किसान असमय बारिश और बाद में फल झड़ने के कारण गंभीर संकट का सामना कर रहे हैं। कई बागान घाटे में चल रहे हैं। किसान तत्काल सरकारी सहायता और क्षति के आकलन की मांग कर रहे हैं।