नंदुरबार : शहादा तालुक्यातील जयनगरसह परिसरात यावर्षीही मोठ्या प्रमाणावर पपईची लागवड झाली आहे. मात्र, दर वर्षाप्रमाणे यावर्षीही उन्हामुळे पपईचे फळ खराब होत असून, उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांकडून फळांवर गोणपाट झाकले जात पपईच्या आहेत.
त्यामुळे गोणपाटचा अधिकचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे. सध्या पपईला सरासरी सात रुपये किलो दर असून, येणाऱ्या दिवसांत चांगला दर अपेक्षित असून, पपईची प्रत खराब होऊ नये, म्हणून शेतकरी धडपड करताना दिसत आहेत.
मागील पाच ते सहा वर्षांपासून पपई पिकावर व्हायरसचा प्रादुर्भाव दिसत आहे. मात्र, पपई हे पीक वजनदार असल्यामुळे तसेच चांगला दर मिळाला, तर थोडाफार नफा राहण्यास मदत होते. म्हणून, परिसरात यावर्षीही पपईची लागवड वाढली आहे. मात्र, यावर्षीही सर्वच शेतकऱ्यांच्या पपई पिकावर विषाणूजन्य व्हायरसचा प्रादुर्भाव लवकर आढळून आल्यामुळे अनेक पपईच्या बागा खराब झाल्या.
ज्या शेतकऱ्यांच्या शेतात व्हायरसमुळे झाडाची छत्री पूर्ण गायब झाली आहे. मात्र, फळधारणा बऱ्यापैकी झालेली आहे. असे शेतकरी पपईचे फळ खराब होऊ नये, म्हणून शेतकरी पपईच्या फळांना गोणपाट व प्लास्टिकचे आच्छादन लावत आहेत.
अनेक शेतकरी पपई पीक काढण्याच्या तयारीत
सध्या पपईला प्रती किलो १ साधारण सात रुपये दर मिळत आहे. वाढत्या महागाईमुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांना एकरी ६० ते ६५ हजारापर्यंत भांडवल लागत आहे. मात्र, यावर्षी एकूण भांडवलात १० ते १५ हजारांची वाढ दिसून येत आहे. कारण, विषाणूजन्य रोगाचा नायनाट करण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खते व विद्राव्य खते यांचे प्रमाण दरवर्षांपेक्षा अधिक प्रमाणात दिली आहेत.
एकरी ८०० पपईची झाडे लागवड होतात. एक गोणपाट साधारण १२ रुपये याप्रमाणे नऊ हजार ६०० रुपये गोणपाट खरेदीसाठी तसेच त्यांना बांधण्यासाठी लागणारी मजुरी हा सर्व अधिकचा खर्च काढण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसून येत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी विषाणूजन्य रोगामुळे फळ धारणा कमी झाल्याने पपईवर रोटाव्हेटर मारून गहू व हरभरा पेरणीचे नियोजन करीत आहेत.
