नाशिक : कळवण तालुक्यासह कसमादे पट्टयात यंदा कांदा उत्पादनात मोठी घट झाली असून, सतत एकाच पिकाची लागवड (पीक फेरबदलाचा अभाव) आणि जमिनीत वाढलेली बुरशी ही यामागील मुख्य कारणे ठरत असल्याचे दिसत आहे. पारंपरिक कांदा पट्टा म्हणून ओळख असलेल्या या भागात आता जमिनीची सुपिकता कमी होत चालल्याने शेतकरी गंभीर चिंतेत सापडले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून बहुतांश शेतकरी एकाच जमिनीत सातत्याने कांदा पीक घेत असल्याने मातीतील सूक्ष्म जीवांचे संतुलन बिघडले आहे. परिणामी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढून मातीवर पांढऱ्या थराचे प्रमाण दिसू लागले आहे. यामुळे मातीतील पोषण तत्त्वांची उपलब्धता घटली असून, पिकांची वाढ खुंटली आहे.
यंदाच्या उन्हाळी हंगामात कांद्याचे उत्पादन अनेक ठिकाणी निम्म्यावर आले असून, काही भागात ७० ते ८० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे वास्तव समोर आले आहे. मोठ्या प्रमाणावर खर्च करूनही अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
कसमादे पट्टयात कांदा हे प्रमुख नगदी पीक असल्याने पीक फेरबदलाकडे दुर्लक्ष झाले. मात्र, त्याचे दुष्परिणाम आता तीव्रतेने जाणवत असून, जमिनीची उत्पादकता झपाट्याने घटत आहे. त्यामुळे भविष्यातील शेती टिकविणे आव्हानात्मक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभाग, महाराष्ट्र शासन व कृषी मंत्रालयाकडून तातडीने ठोस उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
जमिनीत फेरबदल आवश्यक शेतकऱ्यांना नियमित व अचूक माती परीक्षण व पाणी परीक्षण सुविधा उपलब्ध करून देणे, बुरशी नियंत्रणासाठी वैज्ञानिक मार्गदर्शन करणे तसेच पीक फेरबदलाबाबत व्यापक जनजागृती करणे अत्यावश्यक ठरले आहे.
यासोबतच प्रभावित शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीकविमा दावे जलदगतीने निकाली काढणे, सेंद्रिय व संतुलित खते वापरास प्रोत्साहन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन, तसेच पर्यायी पिकांसाठी अनुदान व तांत्रिक मार्गदर्शन देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. कृषी विद्यापीठे व तज्ज्ञांच्या माध्यमातून विशेष मोहिमा राबवून जमिनीतील बुरशी नियंत्रणासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याचीही मागणी पुढे येत आहे.
पीक फेरबदल न केल्यामुळे जमिनीतील पोषण संतुलन बिघडते व बुरशीजन्य रोग वाढतात. शेतकऱ्यांनी शास्त्रशुद्ध पद्धती अवलंबणे गरजेचे असून, प्रत्येक हंगामात पीक फेरबदल केल्यास मिळणाऱ्या उत्पादनात घट येणार नाही तसेच पुढील काळात शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून आवश्यक मार्गदर्शन करण्यात येईल. - अशोक डमाळे, उपविभागीय कृषी अधिकारी, कळवण.
जमिनीत बुरशीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, उत्पादन निम्म्यावर आले आहे. शासनाने कांदा उत्पादनातील घट रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात.- दादाजी जाधव, कांदा उत्पादक शेतकरी.
Web Summary : Nashik onion farmers face drastically reduced yields due to soil fungus from continuous cropping. Lack of crop rotation depletes soil nutrients, causing significant financial losses. Urgent action is needed.
Web Summary : नाशिक के प्याज किसान लगातार फसल के कारण मिट्टी में फंगस से भारी उपज में कमी का सामना कर रहे हैं। फसल चक्र की कमी से मिट्टी के पोषक तत्व खत्म हो रहे हैं, जिससे भारी वित्तीय नुकसान हो रहा है। तत्काल कार्रवाई की जरूरत है।