नाशिक : कांदा दारावरून शेतकरी संतप्त झाले आहेत. कालच या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक संघटनेच्या माध्यमातून बैठक झाली. दुसरीकडे आज शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. अनेक शेतकऱ्यांनी कार्यालयात धडक देत परिसरात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
एकीकडे कांद्याला समाधानकारक दर नाही, दुसरीकडे सरकारच निर्यातीचे कुचकामी धोरण या सगळ्यात कांदा उत्पादक शेतकरी भरडला जात आहे. अशातच कांद्याला हमी भाव द्यावा, चाळीत खराब होणाऱ्या कांद्याला विमा संरक्षण आणि निर्यातीला अनुदान या मागण्यांसाठी आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले.
आज जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट होऊ शकली नाही. परिणामी शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर ठिय्या मांडत निषेध नोंदवला. या दरम्यान शेतकऱ्यांनी हातातील कांदे फोडत "कांद्याचा भाव द्या, नाहीतर सरकारचा भाव घ्या" अशा घोषणा दिल्या.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्याकडे आंदोलकांना घेऊन जात असताना शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवर कांदे फोडत रोष व्यक्त केला.
यावेळी शेतकरी म्हणाले कि, दोन महिन्यापासून कांद्याला भाव नाही, चाळीत कांदा सडू लागला आहे. पण आम्हाला काहीही मदत मिळत नाही. कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या सगळ्याचं उत्तर सरकारकडे आहे का?" असा सवाल यावेळी करण्यात आला. पोलिसांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यांना शांत केले.
Kanda Market : ऑगस्ट महिन्यात कांद्याला काय दर मिळतील, परिस्थिती काय राहील? वाचा सविस्तर