Join us

कांदा दर शेतकऱ्यांच्या मुळावर, मुख्यमंत्र्यांनी लासलगावला बैठक घ्या, संघटनेचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:33 IST

Onion Rate Issue : मुख्यमंत्र्यांनी आमच्या वेदना समजून घेण्यासाठी लासलगाव गाठावे, बैठक घ्यावी, आमचे प्रश्न सोडवावे, अशा आशयाचे पत्र कांदा उत्पादक संघटनेने दिले आहे. 

नाशिक : कांदा बाजारात सततची घसरण, सरकारचे आडमुठे धोरण यामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. या पार्श्वभूमीवर लासलगावला बैठकही पार पडली. आता थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या वेदना समजून घेण्यासाठी लासलगाव गाठावे, बैठक घ्यावी, आमचे प्रश्न सोडवावे, अशा आशयाचे पत्र कांदा उत्पादक संघटनेने दिले आहे. 

राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याचे दर अतिशय कमी झाले असून या बाजारभावात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. या पार्श्वभूमीवर, आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक 28 जुलै 2025 रोजी लेखी पत्र देण्यात आले आहे 

या पत्रामार्फत संघटनेने स्पष्टपणे मागणी केली आहे की, लासलगाव बाजार समितीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अती तातडीने लासलगाव येथे येऊन कांदादराच्या प्रश्नावर विशेष बैठक घेण्याचे आमंत्रण द्यावे. सध्या कांद्याला मिळणारा बाजारभाव हा शेतकऱ्यांसाठी आर्थिक नुकसानीकारक असून सरकारने यामध्ये त्वरित हस्तक्षेप करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.

Kanda Market : ऑगस्ट महिन्यात कांद्याला काय दर मिळतील, परिस्थिती काय राहील? वाचा सविस्तर

मुख्यमंत्र्यांनी संवाद साधावा तसेच, या मागणीस अधिक बळ देण्यासाठी आणि प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनाही स्वतंत्रपणे मुख्यमंत्री फडणवीस यांना अधिकृतरित्या लासलगाव बाजार समितीत बैठक घेण्याचे आमंत्रण देणार आहे.

या बैठकीत कांदा दरांचे स्थिरीकरण, किमान आधारभूत किंमत (MSP) निश्चित करणे, साठवणूक धोरण व निर्यात धोरण, कांदा प्रक्रिया उद्योग व स्वतंत्र कांदा महामंडळाची स्थापना आदी विषयांवर तत्काळ निर्णय घेण्यात यावे अशी कांदा संघटनेची भूमिका आहे 

कांद्याच्या प्रश्नावर शेतकरी सातत्याने आवाज उठवत असून, आता निर्णय घेण्याची जबाबदारी सरकारवर आहे. लासलगावसारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी येऊन थेट शेतकऱ्यांशी संवाद साधावा, अशीही मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे. 

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीनाशिकदेवेंद्र फडणवीस