मुंबई :नाशिक येथील उमराणे रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांना कांद्याचे थकीत बिले अदा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. संचालक मंडळ, उपनिबंधक कार्यालय आणि व्यापारी यांच्यात समन्वय साधून यासंदर्भात उपाययोजना करावी आणि ४५ दिवसांच्या आत याबाबतचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही श्री. रावल यांनी दिले.
विधान भवन येथे नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, संबंधित प्रकरणात एका व्यापाऱ्याच्या मृत्यूनंतर १२५ शेतकऱ्यांना एक कोटी पन्नास लाख रुपये देणे बाकी होते. त्यापैकी २५ लाख रुपये अदा करण्यात आले असून उर्वरित रक्कम तातडीने देण्याची गतीने कार्यवाही करावी. तसेच इतर २० शेतकऱ्यांचे एक कोटी तेरा लाख रुपये थकीत आहेत.
या रकमेच्या वसुलीसाठी संचालक मंडळ आणि उपनिबंधक कार्यालयाने त्वरित उपाययोजना आखावी, असे निर्देशही त्यांनी दिले. खासगी बाजार समित्यांवर पीएमसीप्रमाणे नियम लागू करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल. शेतकऱ्यांचा कृषी माल खरेदी केल्यानंतर निर्धारित कालमर्यादेत पैसे देणे बंधनकारक असून याचे काटेकोर पालन केले जाईल.
परवाने रद्द करणार बैठकीत कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की, ज्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची थकीत बिले दिली नाहीत, पण कृषी मालाची खरेदी सुरू ठेवली आहे, अशा व्यापाऱ्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात यावा. तसेच बाजार समित्यांनी शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ नये याची खबरदारी घ्यावी.