Join us

Nuksan Bharpai : 73 गुंठ्यातील मक्याचे नुकसान; भरपाई मात्र 5 हजार रुपये, वाचा कांद्याला किती मिळाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 18:05 IST

Nuksan Bharpai : उत्पादन खर्चापेक्षाही कितीतरी कमी पटींनी भरपाईचे धनादेश शेतकऱ्यांच्या हाती पडले आहेत.

नाशिक : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत सरकारने आश्वासन दिले आणि काही शेतकऱ्यांना भरपाईचे धानदेश देखील प्राप्त झाले. मात्र, शेतकऱ्यांना देण्यात आलेली भरपाईची रक्कम शेतकऱ्यांची थट्टा ठरली असून, उत्पादन खर्चापेक्षाही कितीतरी कमी पटींनी भरपाईचे धनादेश शेतकऱ्यांच्या हाती पडले आहेत. नांदगाव तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील एका शेतकऱ्याला देखील अशीच नुकसान भरपाई मिळाली आहे. 

गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. सर्व काही होत्याचे नव्हते झाले. शासनाने त्वरित पंचनामे करून दिवाळीपूर्वी भरपाई देण्याचे आदेश दिले होते. मात्र, दिवाळी होऊन पंधरा दिवस उलटले तरी अनेक शेतकऱ्यांना भरपाईदेखील पोहोचलेली नाही. ज्यांना पोहोचली त्यांना अत्यंत तुटपुंजी भरपाई मिळत आहे. 

मका पिकासाठी ८८, तर कांदा पिकासाठी ६५ टक्के नुकसान या सूत्राप्रमाणे नुकसानभरपाई दिली जात असल्याने मका या पिकाला एका गुंठ्यासाठी फक्त ८५ रुपये, तर कांद्याला एका गुंठ्यासाठी फक्त १७० रुपये भरपाई मिळणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. नांदगाव तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील झिपरू शंकर शेळके या शेतकऱ्याची एकूण जमीन ७३ गुंठे असून, यात त्यांनी सर्व मका पिकाची लागवड केलेली होती. 

सर्व मका पिकात कमरेइतके पाणी साचून पिकाची नासाडी झाली आहे. शासनाने या शेतकऱ्याची एकप्रकारे चेष्टा केली असून झिपरू शेळके यांना ७३ गुंठ्यांसाठी मका पिकाला फक्त ५४६० रुपये नुकसानभरपाई अनुदान दिले आहे.

उत्पादन खर्चापेक्षा भरपाईची रक्कम कमीविशेष म्हणजे मका पीक घेताना त्यांना मका बियाणे, शेती मशागत, त्यासाठी लागणारी खते आणि इतर मजुरी यासाठी लागणारा खर्च हा दहा ते पंधरा हजार असून, भरपाई फक्त ५४६० रुपये ही कोणत्या न्यायाने दिली, अशी परिसरात चर्चा आहे. तशीच गत कांदा या पिकाची देखील आहे. 

कांदा पीक घेण्यासाठी एका एकराला हजारो रुपये खर्च होत असून कांद्याला भरपाई म्हणून फक्त १७० रुपये गुंठा अशी घोर चेष्टा शासनाने या नुकसानभरपाईच्या नावाखाली केली आहे. काही शेतकऱ्यांना तर भरपाई मिळावी देखील नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Meager Compensation: Farmers Mocked with Insufficient Crop Damage Relief

Web Summary : Farmers in Nandgaon received paltry compensation for crop loss due to heavy rains. A farmer with 73 Guntha of Maize received only ₹5460. The compensation is far less than the cost of cultivation, especially for onion farmers, causing widespread resentment.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीपाऊसमका