Agriculture News : महसूल विभागांतर्गत (Revenue Department) असणाऱ्या शासकीय सेवेतील गट-अ, ब, क आणि ड मधील पदाच्या नियुक्तीसाठी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन ही एक आवश्यक अर्हता म्हणून विहित करण्यात आलेली आहे. त्यामुळे, महसूल सेवक (कोतवाल) पदाच्या (Kotwal Post) नियुक्तीसाठी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन ही एक आवश्यक अर्हता म्हणून लागू करण्यात आली आहे.
या शासन निर्णयाच्या दिनांकापासून महसूल सेवक (कोतवाल) पदाच्या नियुक्तीसाठी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन ही एक आवश्यक अर्हता म्हणून विहित करण्यात येत आहे.
२. सदर शासन निर्णयातील तरतूदी पुढीलप्रमाणे आहेत.:
- (१) व्याख्या- या निर्णयामध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, -
- (क) "प्रतिज्ञापन" याचा अर्थ, महसूल सेवक (कोतवाल) पदावरील सेवेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने द्यावयाचे प्रतिज्ञापन, असा आहे;
- (ख) "शासन" याचा अर्थ, महाराष्ट्र शासन असा आहे.
- (ग) "सेवा" याचा अर्थ, कोतवाल सेवा भरती नियम, १९५९ अन्वये महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रणाखालील महसूल विभागांतर्गत नियुक्त महसूल सेवक (कोतवाल) पदावरील सेवा असा आहे;
- (घ) "लहान कुटुंब" याचा अर्थ, दोन मुले यांसह पत्नी व पती असा आहे.
- (२) स्पष्टीकरण-
- (एक) एखाद्या जोडप्यास हा शासन निर्णय अंमलात येण्याच्या दिनांकाला किंवा त्यानंतर केवळ एकच मूल असेल त्याबाबतीत, नंतरच्या एकाच प्रसूतीत जन्मलेल्या कोणत्याही एकापेक्षा अधिक मुलांना एकच अपत्य म्हणून समजण्यात येईल.
- (दोन) "मूल" यामध्ये दत्तक घेतलेल्या मुलाचा किंवा मुलांचा समावेश होत नाही,
- (३) लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापनाची आवश्यकता महसूल सेवक (कोतवाल) पदावर नियुक्तीसाठी एक अतिरिक्त अत्यावश्यक अट असेल.
परंतु, सदर शासन निर्णय अंमलात येण्याच्या दिनांकास दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्या व्यक्तीस, अशा अंमलबजावणीच्या दिनांकास असलेल्या तिच्या मुलांच्या संख्येत जोपर्यंत वाढ होत नाही तोपर्यंत या निर्णयानुसार, नियुक्तीसाठी अनर्ह ठरविण्यात येणार नाही.
परंतु आणखी असे की, सदर शासन निर्णय अंमलात येण्याच्या दिनांकापासून एका वर्षाच्या कालावधीत एकाच प्रसूतीमध्ये जन्मलेले मूल किंवा एकापेक्षा अधिक मुले या नियमात नमूद केलेल्या अनर्हतेच्या प्रत्योजनासाठी विचारात घेण्यात येणार नाही.
- (४) प्रतिज्ञापन सादर करणे : महसूल सेवक (कोतवाल) पदासाठी अर्ज करण्याची इच्छा असलेली कोणतीही व्यक्ती, अर्जासोबत या निर्णयातील नमुना "अ" मधील प्रतिज्ञापन सादर करील,
- (५) निर्णय लागू नसणे : जेथे निवड प्रक्रिया ही, हा निर्णय अंमलात येण्याच्या दिनांकापूर्वीच सुरू झाली असेल, त्याबाबतीत हा निर्णय लागू करण्यात येणार नाहीत.