Shivraj Singh Chauhan : केंद्र सरकारच्या माध्यमातून यावर कठोर पाऊले उचलण्यात येत आहेत. आता पीक विमा योजनेत (Pik Vima Yojana) घोळ होणार नाही कारण यात तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. ज्याद्वारे नुकसान झालेल्या शेताचाच सर्वे होऊन नुकसान भरपाई दिली जाणार असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी दिली. ते आज नाशिक दौऱ्यावर होते.
पीक विमा योजनेत घोळ होत असल्याच्या तक्रारी राज्यभरातून समोर येत आहेत. नाशिक जिल्ह्यातून (Nashik District) देखील काही बोगस शेतकऱ्यांच्या नावावर पीक विमा काढल्याचे निदर्शनास आले आहे. आत्तापर्यंत पिक विमा योजनेत देशभरातून 14 कोटी अर्ज आले असून एक लाख 70 हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. मात्र तरीदेखील या योजनेबाबत काही तक्रारी समोर आल्या आहेत.
यात ज्या शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान झाले आहे, ते शेतकरी वंचित राहिले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचे नुकसान नाही झाले. अशा शेतकऱ्यांना देखील लाभ झाल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर सरकार नव्या तंत्रज्ञानाचा वापर या योजनेसाठी करणार असल्याचं केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग यांनी सांगितलं. जवळपास साडेआठशे कोटीहून अधिक रुपयांचा हा प्रकल्प असून सॅटेलाईटच्या माध्यमातून रिमोट सेन्सिंगच्याद्वारे नुकसान झालेल्या ठिकाणाचे फोटो घेतले जातात.
आता चूक होणार नाही...
यानंतर संबंधित नुकसानीचे फोटो आणि माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात येईल आणि यानंतर शेतकऱ्यांचा पिक विमा भरला जाईल आणि त्यानंतर ती नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या डीबीटी खात्यात जमा करण्यात येईल. अशा पद्धतीने यात कोणतीही मानवी चूक होणार नाही, शिवाय जाणून बुजून कोणतीही गडबड होणार नाही, असे सूतोवाच केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी दिले.