Agriculture News : पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Agriculture Minister Manikrao Kokate) रमी खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे कृषिमंत्री कोकाटे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. विरोधक कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे निफाडच्या एका शेतकऱ्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
योगेश राजेंद्र खुळे असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याने कृषिमंत्र्यांना साडेपाच हजार रुपयांची मनी ऑर्डर पाठवली आहे. पावसामुळे सोयाबीनचे बियाणे पेरता आले नाही, त्यामुळे त्यांनी ते बियाणे विकून मिळालेले पाच हजार पाचशे रुपये थेट कृषिमंत्र्यांना पाठवले आहेत. 'मी पाठविलेल्या पैशांचा एक रमीचा डाव खेळावा व त्यामधून मला पैसे मिळवून द्यावे, कारण माझ्याकडे आज कुठल्याही प्रकारचं उत्पन्नाचं साधन राहिलेलं नाही," असे त्यांनी मनी ऑर्डरसोबत कळवले आहे.
मे आणि जून महिन्यात झालेल्या पावसाने खरीप पेरणीला खोळंबा घातला. त्यामुळे बहुतांश भागात शेतात पाणीच पाणी होते. अशावेळी अनेक शेतकऱ्यांना पेरणी करताना अडचणी आल्या. या शेतकऱ्याला देखील आपल्या शेतात सोयाबीन पेरणी करावयाची होती. मात्र शेतात पाणी असल्याने सोयाबीन पेरणी करता आली नाही.
बियाणे विकून पैसे पाठवले यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने सोयाबीनचे १८५० रुपये प्रति बॅगने आणलेले बियाणे विक्री केले. या बियाणे विक्रीतून त्याला ५ हजार ५५० रुपये मिळाले. हेच पैसे त्याने मनी ऑर्डरच्या स्वरूपात कृषिमंत्री कोकाटे यांना पाठवले आहेत. याबरोबरच 'साहेब माझ्यासाठी रमी खेळा, काहीतरी जिंका आणि मला पाठवा, असे म्हणत त्याने चक्क ५ हजार ५५० रुपयांची मनीऑर्डरच माणिकराव कोकाटेंना यांना पाठवली आहे.