भंडारा : कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनात नवमुद्रा शेतकरी उत्पादक कंपनी, आसगाव व सहयोग शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने पवनी तालुक्यातील चौरस भागातील ९ शेतकरी बांधवांनी पारंपरिक धान पिकाऐवजी केळी पीक (Banana Farming) लागवडीकडे वाटचाल केली आहे. योग्य मार्गदर्शन व कठोर परिश्रमाच्या बळावर शेतकऱ्यांनी केळी पिकाचे दर्जेदार उत्पादन घेऊन आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.
चौरस भागातील शेतकरी बांधवांनी यंदा कृषी विभागामार्फत (Agriculture Dep) साधारणतः ५ हेक्टर क्षेत्रात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनाअंतर्गत अनुदानावर केळी पिकाची लागवड केली. शेतकऱ्यांनी कृषी विभाग तसेच केळी पीक तज्ज्ञांच्या माध्यमातून केळी पीक लागवड (Keli Lagvad) व व्यवस्थापन यावर मार्गदर्शन घेतले. पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून अन्य शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
शासकीय योजनांतून करावी लागवड
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून केळी व इतर फळ पिकांची लागवड करावी. सातत्याने अनुभवात येणारे आर्थिक संकट दूर करावे, असे आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना केले.
उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांतर्फे बागांची पाहणी
केळी पिकासंबंधी कृषी अधिकाऱ्यांच्या प्रारंभिक मार्गदर्शनानंतर आता केळीचे पीक जोमात आहे. भंडारा उपविभागीय कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे यांनी येनोडा येथील शेतकरी संजय बावनकर व इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बागांना नुकतीच भेट देऊन पाहणी केली. यावेळी पवनी तालुका कृषी अधिकारी आदित्य घोगरे, मंडळ कृषी अधिकारी दिनेश काटेखाये व कृषी सहायक उपस्थित होते.
केळी खरेदीसाठी जिल्हा बाहेरील व्यापारी इच्छुक
शेतकऱ्यांनी घाम गाळून उत्पादित केलेल्या व परिपक्वतेच्या अवस्थेतील केळी खरेदी करण्याकरिता जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातील व्यापारीसुद्धा इच्छुक असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. सध्या बाजारात केळीला चांगली मागणी आहे. किरकोळ बाजारात ४० ते ६० रुपये डझनचा भाव मिळतो आहे.
धानापेक्षा केळीचे नगदी पीक परवडणारे
केळी पिकासाठी भंडारा जिल्ह्यातील वातावरण अनुकूल असून, पाण्याची उपलब्धताही मुबलक आहे. जिल्ह्यातील इतरही भागांत काही प्रयोगशील शेतकरी केळी पीक घेत आहेत. धान पिकाला पर्यायी नगदी पीक म्हणून केळीचे पीक शेतकऱ्यांकरिता फायदेशीर ठरू शकते. या पिकातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक नफा कमविता येतो, अन्य शेतकऱ्यांनीही या पिकाकडे वळावे, असे आवाहन पद्माकर गिदमारे यांनी केले आहे.
कृषी अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून नव्या पिकाची प्रेरणा मिळाली. परिश्रम लवकरच फळाला येणार आहे. बाजारात केळीला चांगला भाव मिळत असल्याने नफा होण्याचा अंदाज आहे.
- संजय बावनकर, शेतकरी, येनोडा