Nilkanth Spinning Mill : विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आणि स्थानिक बेरोजगारांसाठी दिलासादायक ठरणारा ऐतिहासिक निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. (Nilkanth Spinning Mill)
१६ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत अकोल्यातील निळकंठ सहकारी सूतगिरणी लिमिटेड पुन्हा सुरू करण्यास हिरवा कंदील मिळाला. (Nilkanth Spinning Mill)
भाजप प्रदेश सरचिटणिस आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी देत ५०:४५:५ या तत्त्वावर वित्तीय सहाय्य मंजूर केले.(Nilkanth Spinning Mill)
सूतगिरणीचा इतिहास
स्व. निळकंठ श्रीधर (नानासाहेब) सपकाळ यांनी १९७० मध्ये ही सूतगिरणी स्थापन केली होती. तब्बल ३८ वर्षे उत्कृष्ट दर्जाचे सूत तयार करून शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा जास्त परतावा देण्यात यश आले. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे उत्पादन थांबले आणि सूतगिरणी बंद पडली.
अकरा वर्षांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा
२०१४ पासून रणधीर सावरकर यांनी ही सूतगिरणी पुन्हा सुरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच वस्त्रोद्योग मंत्र्यांसह विविध स्तरावर संवाद साधला. अखेर अकरा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर या प्रयत्नांना यश मिळाले.
शेतकऱ्यांसाठी नवे उत्पन्न, तरुणांसाठी रोजगार
या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या कापसाचे स्थानिक स्तरावर मूल्यवर्धन होणार असून त्यांना अधिक दर मिळतील. बेरोजगार तरुणांसाठीही रोजगाराची दारे खुली होतील. अकोला जिल्ह्यासह पश्चिम विदर्भातीलकापूस उत्पादकांना दिलासा मिळेल.
स्थानिक नेत्यांचे योगदान
सूतगिरणीच्या पुनरुज्जीवनात खा. अनुप धोत्रे, डॉ. रणजित सपकाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष शिरीष धोत्रे यांनीही प्रयत्न केले. रणधीर सावरकर यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून, पत्रव्यवहार व लक्षवेधी सूचनांद्वारे हा विषय सतत जिवंत ठेवला.
या निर्णयामुळे शेतमालाचे मूल्यवर्धन होऊन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधली जाईल. बेरोजगारांसाठी नवी रोजगारसंधी निर्माण होणार असून विदर्भाला नवसंजीवनी मिळणार आहे.- आ. रणधीर सावरकर, प्रदेश सरचिटणिस, भाजप