नाशिक : राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून सन २०१९ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. त्यामुळे राज्य शासनाने पुन्हा कर्जमाफीचा निर्णय जरी घेतला, तरी या थकबाकीदारांना कर्जमाफीचा लाभ होणार नाही.
त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नव्याने आणलेल्या सामोपचार योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे प्रशासक संतोष बिडवई यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.
सामोपचार योजनेस चांगला प्रतिसाद मिळत असून, पहिल्या दिवशी पाच थकबाकीदारांनी योजनेचा लाभ घेतला आहे. एकाच दिवसात २५ लाखांची थकीत कर्ज वसुली झाल्याचेही प्रशासकांनी सांगितले. जिल्हा बँकेत झालेल्या पत्रकार परिषदेत प्रशासक बिडवई यांनी नवीन सामोपचार योजनेची सविस्तर माहिती दिली.
शेतकरी कर्जमाफीकडे डोळे लावून बसले आहेत. शेतकरी संघटनेने कर्जमाफीसाठी रेटा लावला आहे. संपूर्ण व्याज माफ करून मुद्दलाचे समान हप्ते करून द्यावे, अशी आग्रही मागणी संघटनांनी लावून धरली आहे. असे असले, तरी दुसरीकडे जिल्हा बँक अडचणीत असल्याने वसुलीवर भर देत आहे. त्यासाठी जिल्हा बँकेने नवीन सामोपचार योजना आणली आहे. यातून थकबाकी वसुली करणार असल्याचे प्रशासक बिडवई आवर्जून म्हणाले.
नवीन सामोपचार योजना फायदेशीर असून, त्यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. मात्र, तरीही कर्ज फेडण्यास उदासीनता दाखविली, तर मग मात्र कायदेशीर मार्गाने वसुली करण्याचा पर्याय खुला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सटाणा, नामपूर, नांदगाव या भागांतील प्रत्येकी एक, तर मालेगाव तालुक्यातील दोघा शेतकऱ्यांनी समोपचार कर्ज फेड योजनेचा पहिल्याच दिवशी लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा बँक प्रशासकांनी दिली.
४५० अधिकारी-कर्मचारी मैदानातयोजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी बँकेचे ४५० अधिकारी व कर्मचारी मैदानात उतरणार आहे. गावो-गावी, वाड्या-वस्त्यांवर ते बैठका घेतील.थकबाकीदारांच्या घरी जाऊन त्यांना योजना समजावून सांगतील, असे नियोजन केले असल्याची माहिती बिडवई यांनी यावेळी दिली.