Join us

नाशिक जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांनी शेतात लावले काळे झेंडे, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 18:19 IST

Nashik Jilha Bank : आज जिल्ह्यातील निफाड तालुक्यातून शेतात काळे झेंडे लावून अनोख्या आंदोलनाला सुरवात झाली. 

Nashik Jilha Bank : गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी आंदोलन सुरु आहे. नाशिक जिल्हा बँकेच्या माध्यमातून वसुली सुरु आहे, या वसुलीला स्थिगिती द्यावी यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या अनुषंगाने आज जिल्ह्यातील निफाड तालुक्यातून शेतात काळे झेंडे लावून अनोख्या आंदोलनाला सुरवात झाली.        महाराष्ट्र शासनाने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करणार अशी घोषणा केली होती. मात्र वर्ष उलटले तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यामुळे व नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करण्याचे व सक्तीचे कर्ज वसुली करीत आहेत. 

शेतकरी महाअधिवेशनात शेतकऱ्यांनी दहा ठराव पारित केले होते. या ठरावांमध्ये शेवटचा ठराव शासनाचा निषेध करण्यासाठी व कर्जमाफी जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत शेतावर काळे झेंडे लावून व घरावर काळे झेंडे लावून निषेध नोंदवण्याचे ठरविण्यात आले होते.

त्यानुसार आज निफाड तालुक्यातील थेरगाव, शिरजगाव येथील जयराम मोरे, वडाळी येथील सोमनान झाल्टे, पिंपरी येथील गोरख जाधव, रौळस गंगाधर नाना, सोमनाथ सहाने या शेतकऱ्यांनी काळे झेंडे लावून निषेध व्यक्त केला. 

संपूर्ण जिल्हाभर ज्या शेतकऱ्यांकडे कुठल्याही बँकेचे कर्ज असेल किंवा जिल्हा बँकेचे कर्ज असेल त्यांनी आपल्या शेतात व घरावर काळे झेंडे लावून निषेध नोंदवण्याचे आवाहन शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे यांनी केले आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीनाशिकबँकशेतकरीपीक कर्ज