- किशोर मराठे
नंदुरबार : सातपुड्यातील वनक्षेत्रात नैसर्गिक पद्धतीने उगवणाऱ्या मशरूममधील जैविक आणि औषधीय घटक शोधण्यासाठी बंगळुरू येथील प्रयोगशाळेचे संशोधक जिल्ह्यात येणार आहेत.
त्यांच्याकडून जिल्ह्यातील सातपुड्यात उगवणाऱ्या मशरूमचे संशोधन करण्यात येणार आहे. यामुळे नैसर्गिक पद्धतीने उगवणाऱ्या मशरूममधील विविध घटकांचे बहुपयोगित्व सिद्ध होणार आहे.
नंदुरबार शहरातील जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश देवरे व मशरूम शेती व्यावसायिक मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली जिजामाता महाविद्यालयाचे विद्यार्थी सातपुड्यातील वनक्षेत्रात अभ्यासासाठी गेले होते. या ठिकाणी त्यांच्याकडून मशरूमच्या नमुन्यांचे संकलन करण्यात आले होते. हे नमुने बंगळुरू येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले गेले आहेत. या ठिकाणी औषधीय व जैविक दृष्टिकोनातून संशोधन सुरु झाले आहे.
विविध आजारांवर गुणकारी ठरणार ?
झाडांवर उगवणारे मशरूम्स, ऑयस्टर आणि बँकेट फंगी याच्या प्रजातींचा प्रयोगशाळेत अभ्यास करण्यात येणार आहे. यातील औषधीय गुणधर्म असलेले मशरूम कॅन्सर, मधुमेह या आजारांवर गुणकारी आहेत किंवा कसे, तसेच आरोग्यवर्धक आहेत किंवा कसे यावर संशोधन करण्यात येत आहे. मृत झाडांवर उगवणारे मशरूम जैवविघटनात महत्त्वाची भूमिका बजावतात.
रोजगाराच्या वाटा, प्रजातींचा उलगडा होणार
दुर्गम भागात अजूनही अनेक अज्ञात मशरूम प्रजाती असण्याची शक्यता असल्याने देशभरातील मायकोलॉजिस्ट सातपुडा परिसरात येऊन येथील अद्भुत जैवविविधतेवर संशोधन करत आहेत. ही मोहीम केवळ विज्ञानासाठी नाही, तर स्थानिक आदिवासी समाजासाठी रोजगार व माहितीचा नवा मार्ग खुला करणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. देवरे आणि राजेंद्र वसावे यांनी दिली आहे.