- किशोर मराठे
नंदुरबार : चौदाशे एकर जमिनीवर एक एक झाड लावत जंगल उभारणारे व अनेक प्राण्यांना, पक्ष्यांना ‘घर’ देणाऱ्या पद्मश्री पुरस्कार ने सन्मानित आसाममधले श्री जादव पायेंग. जादव पायेंग हे प्रत्येक पर्यावरणप्रेमींच्या ओठावरचे नाव. असेच एक जादव पायेंग (Jadav Payeng) खान्देशात असून त्यांना खान्देशचे जादव पायेंग म्हंटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही, असे या अवलियाचे नाव बिलाड्या वळवी उर्फ़ बिलाड्या बाबा आहे.
बोडका झालेल्या सातपुड्याच्या परिसराला (Satpuda Area) पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी अतिदुर्गम भागातील ७० वर्षीय बिलांड्या बाबा झटत आहेत. त्यांनी वीस वर्षांत तब्बल पंचवीस हजारांहून अधिक रोपे स्वखर्चाने लावली आहेत. दुर्दम्य इच्छाशक्ती व अथक परिश्रमाच्या जोरावर जवळपास सतरा हजार रोपांचे संवर्धन करीत असलीचा परिसर हिरवागार केला आहे.
सातपुड्याच्या परिसरात पूर्वी विपुल प्रमाणात वनसंपदा होती. मात्र कालांतराने ती नष्ट झाली. सातपुड्याचा परिसर पुन्हा एकदा हिरवागार होण्यासाठी शासकीय यंत्रणा, सामाजिक संघटना काम करीत आहे. असाच एक प्रयत्न बिलाड्या जुगला वळवी (वय ७०, रा. असली, महूपाडा, ता. अक्राणी) यांनी चालविला आहे. नष्ट झालेली वनसंपदा पुन्हा नव्याने प्राप्त करण्याचा चंग बिलाड्या बाबांनी मनाशी बांधला.
बिलाड्या बाबांनी रोपांसाठी पाणी नसल्याने असलीच्या दुसऱ्या घाटातून चारी खोदून त्याद्वारे पाणी उपलब्ध केले. तसेच वेळप्रसंगी डोक्यावर पाणी वाहत रोपांना पाणी दिले. त्यांना बाहेरगावी नोकरीला असलेला मुलगा विजय वळवी यांची साथ लाभली असून, विजय वळवी त्यांना दरवर्षी हजारोंच्या संख्येने विविध जातींची रोपे आणून देतात. त्यामुळे आज जवळपास सतरा हजार वृक्ष त्याठिकाणी असून, हा परिसर हिरवागार झाला आहे.
जंगलात राहून वृक्षांचे संवर्धन
असली येथील वन विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या ६० एकर जागेवर वीस वर्षांत दोन हजार आंबे, चार हजार सागवान, पाच हजार बांबू आणि चारोळी, महू, आवळा अशा इतर जातींची १४ हजार अशी एकूण २५ हजारांहून अधिक रोप स्वखर्चाने लावली. बिलाड्या बाबांनी त्याच परिसरात एका झोपडीत राहून लावलेल्या रोपांचे संवर्धन केले. प्रसंगी त्यांना साप व इतर हिंस्त्र प्राण्यांना तोंड द्यावे लागले. मात्र न डगमगता त्यांनी त्यांचे काम सुरूच ठेवले.
पर्यावरणाच्या समतोलासाठी प्रयत्न
ज्या ठिकाणी बिलाड्या बाबांनी रोप लावत त्यांचे संवर्धन केले आहे, ती जमीन वन विभागाची आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी असे प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या बिलाड्या बाबांना मानवी दृष्टिकोनातून व त्यांच्या सद्भावनेचा विचार करून संबंधित विभागाने त्यांच्या कार्यास प्रोत्साहन द्यायला हवे, अशी अपेक्षा त्यांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
"घनदाट जंगल असलेला सातपुड्याच्या दुर्गम भागातील असली हा परिसर कालांतराने अक्षरशः बोडका झाला. त्यामुळे स्वयंप्रेरणेने सदर परिसर हिरवागार करण्याचे ठरविले. त्यासाठी हजारोंच्या संख्येने रोप लावत त्यांचे संवर्धन केले. मात्र यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. परंतु आता परिसर हिरवागार झाल्याचे समाधान आहे."
-बिलाड्या वळवी, ग्रामस्थ, असली