नंदुरबार : सततचा अनियमित हवामान बदल व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामात काही रिस्क न घेता ऊस लागवड केली जात आहे. जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर, चिनोदा, मोड, मोहिदा परिसरात उसाची लागवड करण्यात येत असल्याचे चित्र आहे. खरीप हंगामात अवकाळीमुळे मोठा फटका बसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
शेतकऱ्यांकडून शेतजमिनीची खोलगट नांगरटी करण्यात येऊन त्यानंतर सरी करण्यात येत आहे. गरजेनुसार खते टाकून उसाची लागवड करण्यात येत आहे. त्यानंतर पाणी देणे सुरू केले आहे. लागवडीसाठी १० ते ११ महिन्याचे उसाचे निरोगी बियाणे वापरण्यात येत आहे. दोन डोळ्यांच्या टिपरीमध्ये १५ ते २० सेंटीमीटर अंतर ठेवून लागवड करण्यात येत आहे. तसेच खोल दाबली जाणार नाही याचीही काळजी घेतली जात आहे.
डिसेंबर ते फेब्रुवारीचा हंगाम उस लागवडसाठी चांगला
ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे असे शेतकरी सध्या ऊस लागवडीकडे वळले असून, सध्या परिसरात ऊस लागवडीला वेग आल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी हा हंगाम उसासाठी चांगला राहत असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून ऊस लागवड सुरू आहे. यामुळे परिसरात खते देणे, उसाचे बेणे तोडणी, ऊस लागवड आदी कामे सुरू असून, शेतमजुरांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत आहे.
जोखीम न पत्करता बहुतेक शेतकरी ऊस लागवडीकडे वळले आहेत. अनियमित हवामान, अवकाळी पाऊस याची झळ ऊस पिकाला अत्यल्प प्रमाणात बसत असल्याने ऊस लागवडीस प्राधान्य दिले जात आहे.
- पोपट पाटील, शेतकरी, चिनोदा
