Mosambi Farming : मोसंबी पिकाच्या आंबा बहारावर अचानक वाढलेली फळगळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. (Mosambi Farming)
वाढत्या हवामानातील अस्थिरता, पाण्याच्या असमतोल व्यवस्थापनामुळे शेकडो हेक्टरवरील मोसंबी बागायत संकटात सापडली आहे. (Mosambi Farming)
परिणामी, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कीड व्यवस्थापन संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले.(Mosambi Farming)
८,५०० हेक्टरवरील मोसंबी उत्पादन धोक्यात
पैठण तालुक्यात सध्या अंदाजे ८ हजार ५०० हेक्टरवर मोसंबीची लागवड आहे. मात्र, यावर्षी आंबा बहाराच्या काळात अचानक वाढलेल्या फळगळतीमुळे झाडावरील फळे झडू लागली आहेत.
यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली असून, अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
शास्त्रज्ञ बांधावर; थेट मार्गदर्शन
या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. प्रभू नारायण मीना, डॉ. राघवेंद्र व डॉ. मुकेश खोकड हे शास्त्रज्ञ नवी दिल्लीहून दाखल झाले. त्यांनी वडवाळी, वरुडी, बोरगाव, पाचलगाव, वाहेगाव, धनगाव या गावांत पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
फळगळ होण्यामागील कारणं
* अन्नद्रव्यांचा अभाव
* पाण्याची असमतोल मात्रा
* फुलोऱ्याच्या वेळी चुकीचे व्यवस्थापन
* हवामानातील तणाव
* या घटकांमुळे झाडांमध्ये ताण निर्माण होतो आणि फळगळ वाढते.
तांत्रिक मार्गदर्शन आणि व्यवस्थापनावर भर
शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना 'हे' उपाय सुचवले
* योग्य खत व्यवस्थापन
* फुलोऱ्याच्या काळात विशेष काळजी
* पाण्याचे संतुलित नियोजन
* कीड आणि रोग नियंत्रणासाठी योग्य वेळचे फवारणी शेड्यूल
अधिकाऱ्यांची उपस्थिती
या पाहणी दौर्यात तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, डॉ. दीप्ती पाटगावकर, डॉ. बसवराज पिसुरे, डॉ. संजूला भवर, कृषी अधिकारी वाकचौरे, चौधरी, कुसळकर, कृषी विज्ञान केंद्राचे जयदीप बनसोडे, प्रमोद जाधव, किशोर शेरे आदी उपस्थित होते.
फळगळतीमुळे आर्थिक गणित बिघडले
मोसंबी पीक हे यंदा भरात असताना अचानक फळगळ सुरू झाली. काही शेतकऱ्यांनी फुलोऱ्याच्या वेळी पाण्याची मात्रा कमी केली, तर काहींनी ती वाढविली.
या असमतोलामुळे झाडे तणावात आली आणि झाडावरची फळे झडू लागली. शेतकऱ्यांनी मोसंबीच्या उत्पादनासाठी आधीच मोठा खर्च केला होता. आता उत्पादनात घट झाल्याने बाजारात दर टिकेल की नाही, याबाबतही चिंता वाढली आहे.
फळगळ ही एकसंध कारणांमुळे घडणारी प्रक्रिया आहे. खतांचा अति किंवा कमी वापर, पाण्याचे ताणतणाव आदींमुळे ती होते. नियोजन केल्यास तो टाळता येतो. - डॉ. प्रभू नारायण मीना, राष्ट्रीय कीड व्यवस्थापन संस्थान, नवी दिल्ली